स्थैर्य, सातारा, दि.०३: धावत्या रेल्वेतून फेकून दिलेल्या जखमी मुलीला बुधवारी जिल्हा शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या पीडित मुलीसोबत तिचे पालक आणि कुटुंबीय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी, एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान सोमवारी मध्यरात्री घडला होता. यामध्ये मुलगी जखमी झाली होती. या घृणास्पद प्रकारानंतर रेल्वे पोलीस व पुणे पोलिसांनी काही तासातच संशयितास भुसावळ येथून अटक केली. प्रभु मल्लाप्पा उपहार (वय 33, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सैन्यदलात झांसी येथे कार्यरत आहे.
दरम्यान, जखमी पीडित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एक दिवस तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागामध्ये वैद्यकीय अधिकार्यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. मात्र तिच्या पालकांनी त्या मुलीला सातार्यातील खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी दुपारी मुलीला खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या मुलीची प्रकृती स्थिर असून ती उपचाराला प्रतिसाद देत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.