आदर्कीजवळील धावत्या ट्रेनमधून मुलीला फेकून दिले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.०२: एका आठ वर्षे वयाच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिला चालत्या रेल्वेतून ढकलून देण्याचा प्रकार आदर्की ते वाठार स्टेशन दरम्यान घडला आहे. यामध्ये मुलगी जखमी झाली आहे. संशयितास रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली असून प्रभु मल्लाप्पा उपहार वय 33, रा. संगळ पो. सुमधूर, जि. बेळगाव असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सैन्यदलात झांसी येथे कार्यरत होता.

याबाबत माहिती अशी, मंगळवारी गोवा-निजामुद्दीन एक्सप्रेस गोव्यावरून सुटल्यानंतर रात्री दीड वाजता सातारा पास करून लोणंदला जाते. या गाडीत एस-7 डब्यात संबंधित कुटुंब प्रवास करत होते. रात्री जेवण झाल्यानंतर मुलगी बर्थवर झोपली होती. संशयिताने मुलीस झोपेतच उचलून बाथरुममध्ये नेले. बाथरुमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलीस जाग आली. तिने आरडा-ओरडा सुरू केला. तिने आरोपीला लाथा मारल्या. लाथा मारल्यानंतर आरोपीने मुलीस रडू नको, आई-वडिलांकडे सोडतो, असे सांगितले व तिला बाथरुमच्या बाहेर घेवून आला. यानंतर संशयिताने अचानक दरवाजा उघडून मुलीस ट्रेनच्या बाहेर फेकून दिले. योगायोगाने आदर्की स्टेशन पास झाल्याने घाटरस्ता सुरू झाला होता. यामुळे ट्रेनचा वेग ताशी 20 किमी इतका कमी होता. त्यामुळे मुलगी ट्रेनमधून पडली तरी तिला गंभीर इजा झाली नाही. मुलगी पायावर पडल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तसेच तिच्या हनुवटी व हाताला जखमा झाल्या. ती तेथे पडल्याचे सकाळी गावातील स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी तिच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले. जेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिने खरी हकीकत सांगितली. तेव्हा ही घटना धावत्या रेल्वेच्या डब्यात घडली असल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने हालचाल केली. महाराष्ट्र राज्य लोहमार्गच्या अप्पर पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे यांनी ट्रेन पूर्णपणे ब्लॉक करण्याचे आदेश दिले जेणेकरून आरोपी पळून जाऊ नये. त्यानुसार रेल्वेेचे सर्व डबे ब्लॉक करण्यात आले. दरम्यान, लोणंदपासून जळगाव-भुसावळपर्यंत ट्रेनमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एकूण 300 ते 400 पोलीस कॉन्स्टेबल तसेच रेल्वे कर्मचारी चढवले गेले. मुलीने दिलेल्या वर्णनानुसार जवळपास 25 इसमांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात आली. त्यातून चारजणांना ताब्यात घेतले. या चौघातून मूळ संशयिताची ओळख पटली. त्याची चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. त्याचा फोटो व्हॉटसवरून सातारा येथे पोलिसांना पाठवला. तो फोटो पीडित मुलीस दाखवला असता मुलीने संशयितास ओळखताच संबंधितास पोलिसांनी भुसावळ येथे अटक केली.

दरम्यान, रेल्वेचे पोलीस अधीक्षक यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात येवून जखमी मुलीच्या विचारपूस केली. सेेेंट्रल रेल्वेचे पोलीस दलाचा रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे पोलीस तसेच टीसी या डब्यात हजर असणे गरजेचे होते. तथापि, भविष्यात बाबत योग्य ती अंमलबजावणी करणार असल्याचेही रेल्वेच्या पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!