स्थैर्य, सातारा, दि. २० : जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावरील रंगीबिरंगी फुलांचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असताना या वर्षी फुलांचा अनोखा नजराणा कोरोनामुळे पर्यटकांच्या नजरेचे पारणे फेडण्यासाठी खुला होणार की नाही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. अद्याप हंगामाचे कोणतचे नियोजन झाले नसल्याने व पर्यटनावर बंदी कायम असल्याने कास पठारावरील फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी बंदच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र यामुळे स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.
पठारावरील नैसर्गिक रंगीबिरंगी रानफुलांच्या बहराला काहीशा प्रमाणात सुरवात झाली असून काही पांढर्या, लाल, गुलाबी, निळसर रंगाच्या फुलांच्या छटा उमलल्या आहेत. येत्या दहा ते पंधरा दिवसानंतर फुलांच्या मुख्य बहराला प्रारंभ होण्याचे चित्र निर्माण झाले असून नेहमीप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पठार रंगीबिरंगी फुलांनी बहरून जाणार आहे.
जगातील पर्यटकांच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरलेले आणि गेल्या दहा वर्षात जगभरात प्रसिद्धी प्राप्त झालेलं कास पुष्प पठारावरील दुर्मीळ रानफुलांचा नजराणा पाहण्यासाठी गेल्या दहा वर्षात जगभरातील लाखो पर्यटकांनी कास पठारला भेट देऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला आहे. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट कायम असल्याने व शासनाने पर्यटनावर बंदी घातली. कास पठारावरील हंगाम बंद राहणार आहे.