दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2023 | फलटण | अतिशय प्रतिकूल परिस्थितीत एवढ्या मोठ्या स्पर्धेत विजय मिळवून गावाचा नावलौकिक राज्यस्तरावर वाढवला त्यामुळे सर्व तरुण मंडळ सोनगाव यांचे वतीने विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन गुणगौरव व सन्मान करण्यात आला. यामध्ये सोनाली खरात (प्रथम क्रमांक), राजवीर गोरवे (प्रथम क्रमांक), सुरंजन नाळे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सोनगाव येथे सुंदर माझे सोनगाव अंतर्गत किल्लेस्पर्धा बक्षीस वितरण व राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. दिवाळी सणाचे औचित्य साधत शिवाजी महाराजांचा इतिहास गावातील शालेय विद्यार्थ्यांना आत्मसात व्हावा म्हणून सुंदर माझे सोनगाव अंतर्गत भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. तसेच स्टेअर्स फौंडेशन सोलापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आनंदात पार पडला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास मुलांना समजावा, यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना किल्ल्यांची आवड निर्माण व्हावी, यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी झालेल्या गड-किल्ले स्पर्धेत गावातील जवळपास सर्व स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा ही उत्कृष्ट किल्लेबांधणी व त्यावरील तोंडी परीक्षा अशा संयुक्त निकषांवर आधारित होती. स्पर्धेत लहान गट व मोठा गटातून उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पहार, ट्रॉफी, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला , स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.