स्थैर्य, मुंबई, दि. २१: `तौक्ते` चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व राज्यातील इतर जिल्ह्यातील वीजयंत्रणेचे नुकसान झाले. दरम्यान, खंडित झालेला वीजपुरवठा महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर सुरळीत केला. याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेऊन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कृती आराखडा तयार करून विविध ठिकाणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच अधिकाधिक मनुष्यबळ या कामी लावण्याचे व लागणारी पुरेशी सामुग्री उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव तथा महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (संचलन) संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (पारेषण) श्रीकांत राजूरकर यांनी संबंधित मुख्य अभियंते व अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य त्या सूचना देऊन कामाबाबत वारंवार पाठपुरावा केला.
नैसर्गिक आपत्तीमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास सर्वप्रथम प्राधान्याने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे सोबत यंत्रणा दुरूस्तीचे काम देखील युध्दपातळीवर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले होते. सध्या कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे प्रामुख्याने कोविड रूग्णालये, ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उदयोग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवांचा वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी निर्देश दिले होते.
हवेच्या तीव्र जोरामुळे २२० के. व्ही. बॉम्बे डाईंग-सहारा वाहिनीच्या मनोऱ्याच्या वरच्या टोकाला असलेली अर्थ वायर वाहिनीवर पडली. या दोन मनोऱ्यादरम्यान मोठी नदी होती. या परिस्थितीतही मुसळधार पाऊस असताना महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रीच दुरूस्ती करून वाहिनी पूर्ववत केली.
मुंबई परिसराला वीजपुरवठा करणारी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव ही वाहिनी (दि.१८) बंद पडली होती. उपकेंद्रातील सुरक्षा प्रणालीनुसार हा बिघाड कळवा उपकेंद्रापासून ३८ किलोमीटर अंतरावर माथेरान येथील डोंगरादरम्यान होता. महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्री युध्दपातळीवर कामाचे नियोजन करून सकाळी वीजवाहिनी सुरू केली.४०० के. व्ही. कळवा-पडघे या वाहिनीची अर्थवायर विद्युत तारावर पडून विद्युत वाहिनी बंद पडली. बिघाडाचे ठिकाण तळोजा रेल्वेक्रॉसिंगजवळ होते. तसेच चक्रीवादळामुळे झाडे पडल्याने रस्ते बंद होते. दरम्यान, महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे विभागाशी तात्काळ संपर्क साधून भरपावसात अर्थ वायरचा अडथळा दूर केला. त्यामुळे ४०० के. व्ही. कळवा-पडघे ही वाहिनी पूर्ववत करण्यात आली. २२० के. व्ही. टेमघर या उपकेंद्रात अतिवृष्टी व वादळामुळे रात्री दोन वाजता विद्युत उपकरणे नादुरूस्त झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित कार्यवाही करून रात्री साडेतीन वाजता टेमघर वाहिनी व उपकेंद्राचा विद्युत पुरवठा पूर्ववत केला.
१०० के. व्ही. तळोजा येथून दोन वाहिन्या लिंडे ऑक्सिजन कारखान्यास वीजपुरवठा करतात. या दोन्ही वाहिन्या एकाचवेळी बंद पडून ऑक्सीजन कारखान्यास वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर अवघ्या ४५ मिनिटांत विद्युत पुरवठा पूर्ववत केला.पडघे, कळवा, कलरकेम, बोईसर, आपटा, उरण, कुडूस, डोंबिवली, वसई, ट्रॉम्बे, बोरिवली, नागोठाणे व इतर उपकेंद्रातील संबंधित अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत कठीण परिस्थितीतही ऑक्सीजन कारखाने, कोविड केंद्रे यांना विद्युत पुरवठा अखंडित ठेवला. चक्रीवादळाच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी महापारेषणने योग्य प्रकारचे नियोजन व दक्षता घेतली होती. तसेच तिन्ही वीज कंपन्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील समन्वय व संपर्कामुळे वीजपुरवठा सुरळीत राखता आला, याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अभिनंदन केले आहे.