दैनिक स्थैर्य । दि.०७ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दु:खद निधनामुळे पार्श्वगायन आणि संगीत क्षेत्रातील एका सुरेल युगाचा अंत झाल्याची शोकसंवेदना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.
लतादीदींनी संगीत क्षेत्रातील आपल्या ७८ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एकाहून एक सरस अशी तब्बल २५ हजार अजरामर गाणी गायिली. केवळ मराठी वा हिंदीच नव्हे तर जवळपास सर्वच प्रमुख भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन करून कोट्यवधी रसिकांना अलौकिक स्वरानंद दिला!
‘ए मेरे वतन के लोगो..जरा आँख मे भर लो पाणी..हे त्यांचे सुमधूर गाणे ऐकून आजही देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटते.
लतादीदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर हे गाणे गायिले असता नेहरूजींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लतादीदींच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची अपरिमीत हानी झाली असून जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दिवंगत लतादीदींना माझी विनम्र श्रद्धांजली अर्पण करीत असून आपल्या अजरामर गाण्यांमधून लतादीदी रसिकांच्या हृदयात कायमच राहतील, अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.