वर्धेच्या ज्ञान यज्ञातील विचाराचे अमृत समाजाला नवी दिशा देण्याचे काम करेल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ फेब्रुवारी २०२३ । वर्धा । वर्धेच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या साहित्य संमेलनाच्या ज्ञान यज्ञातून विचाराचे अमृत मिळाले आहे. या विचारातून समाजाला नवी दिशा देण्याचे काम होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप श्री.गडकरी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तर पाहुणे म्हणून आ.पंकज भोयर, माजी खासदार तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष दत्ता मेघे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे, कार्यवाह डॉ.उज्वला मेहेंदळे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष तथा संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.प्रदीप दाते आदी उपस्थित होते.

साहित्यिकांनी समाजाला जोडण्याचे, चांगल्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. जे त्रिकालाबाधित आहे ते जनतेपर्यंत नेण्याचे काम साहित्य करते. साहित्य, संस्कृतिचे समाजात फार मोठे योगदान आहे. साहित्य, काव्य,  नाटक, संगीताचा समाज व्यवहारावर परिणाम होत असतो. समाज जीवन कशा पध्दतीने घडवायचे याचे प्रतिबिंब साहित्यातून उमटते. मराठीत पु.ल.देशपांडे, आचार्य अत्रे यांच्यासह संत मंडळींनी सामाज जिवनावर परिणाम करणारे साहित्य दिले, असे पुढे बोलतांना श्री.गडकरी यांनी सांगितले.

समाज बदलायचा असेल तर व्यक्तीला बदलले पाहिजे. व्यक्ती बदलासाठी संस्कार महत्त्वाचे असतात. संस्कार विचारातून येतात आणि सकस विचारासाठी सकस साहित्य महत्त्वाचे आहे. पुस्तके वाचनाचा परिणाम विचारांवर होतो. यातूनच नवी ज्ञान पिढी निर्माण होते. समाजाला ताकद देण्याची क्षमता साहित्यात आहे. साहित्याचा परिणाम समाजमनावर होत असतो, असे श्री.गडकरी म्हणाले.

आताच्या पिढीत फार झपाट्याने बदल होत आहे. पिढीतील या बदलाची नोंद आणि अंतर लक्षात घेता साहित्य, काव्य, सादरीकरणात बदल करण्याची गरज आहे. नवनवीन माध्यमे येत असली तरी पुस्तकांचा वाचक वर्ग कायम आहे. मात्र नवीन पिढी पाहिजे तेवढे स्वारस्य वाचनात दाखवत नाही, हे दुर्दैवी आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग नव्या पिढीला वाचकप्रिय बनविण्यासाठी केला पाहिजे. रामायण, महाभारत, भगवतगिता, कुराण, बायबल यातून समाजकल्याणाचा संदेश देण्यात आला आहे, असे सांगून ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ग्रामगीता, गजानन महाराज यांची गाथा डिजिटल स्वरूपात करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. संमेलनाच्या आयोजनाठी प्रशासनाने केलेल्या चांगल्या सहयोगाबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर म्हणाले, राजकारण बाजूला ठेऊन साहित्य संमेलनात एकत्र येण्याची परंपरा आजवर टिकली आहे. कोणत्याही संमेलनाध्यक्षाला मिळाले नसेल इतके प्रेम मला मिळाले आहे. माणसे जोडली गेली पाहिजे हा संमेलनाचा उद्देश आहे. संमेलनात मनातला आवाज उमटला जातो, बुलंद होतो, असे न्यायमूर्ती चपळगावकर म्हणाले.

महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा.दाते यांनी प्रास्ताविकातून संमेलनात तीन दिवस राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राबणाऱ्या व्यक्तींसह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. काही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले. समारोप समारंभास साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!