स्थैर्य, फलटण, दि.१६ : आज संपूर्ण भारतात एकाचवेळी कोवीड 19 लसीकरणाचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने….
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरात कोविड 19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. हा संपूर्ण जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम असेल ज्याची व्याप्ती संपूर्ण देशाच्या कानाकोपर्यापर्यंत असेल, असा केंद्र सरकारचा दावा आहे. याप्रसंगी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण 3006 ठिकाणे आभासी पद्धतीने जोडली जातील. पहिल्या दिवशी प्रत्येक ठिकाणी सुमारे 100 लाभार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. हा लसीकरण कार्यक्रम लसीकरण करण्याच्या प्राधान्य गटांच्या तत्त्वांवर आधारित आहे आणि आयसीडीएस कामगारांसह सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आरोग्य कर्मचार्यांना या टप्प्यात ही लस मिळणार आहे. यामध्ये फलटण तालुका देखील मागे नसून सद्यस्थितीत फलटण तालुक्यासाठी 2013 लसींची उपलब्धता झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरण सत्रामध्ये फलटण तालुक्यातील सर्व शासकीय आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व त्यांच्या दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी यांना कोवीड-19 लसीकरण दोन डोसमध्ये देण्यात येणार आहे. फलटण शहरामध्ये शंकर मार्केट परिसरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर तालुक्यातील तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये कोविड लसीकरणाची सुरुवात करण्यात येणार आहे.
अर्थात लसीकरण मोहिमेची सुरुवात ही केवळ ‘फ्रंट लाईन वर्कर्स’ पासून होत असली तरी निश्चितच ही बाब सर्वांसाठीच दिलासादायक आहे. परंतु, एकीकडे लसीकरणाची मोहिम सुरु होत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाबाधितांची संख्या अद्याप शून्यावर आलेली नसून कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरुच आहे, याचे भान अनेकांना नसल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. केवळ फलटण शहरापुरता विचार केला तर शहरात या ना त्या कामासाठी वावरणार्या 100 माणसांचे जर निरीक्षण केले तर किमान 80 लोक हे विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसींगचा फज्जा उडलेला सर्रास दिसत आहे. मुळात कोरोनाचा प्रार्दुभाव संपलेला नाही आणि आपल्या लोकांमध्ये स्वयंशिस्त नाही हे या आधीही अनेकदा अधोरेखित झालेले असताना स्थानिक प्रशासन विना मास्क फिरणार्यांवर, सोशल डिस्टंसींगचे नियम न पाळणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा का उचलत नाही? नियमांच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या तीन – चार महिन्यांपासून ढिलाई का दिली जात आहे? असा सवाल नियमाने वागणार्यांना पडल्यावाचून राहत नाही.
खरं तर, सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेहर्याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा. सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत यावी. सदर आदेशाचे उल्लंघन झालेस ग्रामीण भागासाठी र.रु.2000/- व शहरी भागासाठी र. रु. 3000/- दंड आकारावा. तसेच 7 दिवसापर्यत दुकान सक्तीने बंद करावे. सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणार्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे, असे आदेश शासनाच्या ‘पुन्हा सुरु मोहिमे अंतर्गत’ दिनांक 31 जानेवारीपर्यंत सातारा जिल्हाधिकार्यांनी यापूर्वीच सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले आहेत. मात्र याकडे केवळ फलटणच नाही तर जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सद्यस्थितीत दुर्लक्षच सुरु आहे आणि हे सर्वसामान्यांसाठी घातक आहे.
शेवटचा मुद्दा : भारतात दररोज आढळणार्या नवीन कोविड बाधित रुग्णांच्या संख्येत घसरणीचा कल कायम आहे. मृत्यू दरही घटत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 90% च्या पुढे आहे. याबाबी निश्चितच समाधानकारक आहेत. मात्र असे जरी असले तरी महाराष्ट्रात आजही रोज हजारो रुग्ण कोरोना बाधीत होत आहेत. लसीकरण जरी सुरु होत असले तरी, त्याचे निष्कर्ष समोर येईपर्यंत लसीकरणाची व्याप्ती वाढवण्याची घाई सरकार करणार नाही. लसीकरण प्रक्रिया स्थिर झाल्यावर आणि पुढे गेल्यावर हळूहळू लसीकरण स्थळांची संख्या वाढून ती आपल्यासारख्या सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे. अर्थातच याला देखील मोठा कालावधी लागू शकतो. त्यामुळे शासनाने घालून दिलेले नियम आजही आपल्या सगळ्यांवर बंधनकारक आहेत याचे भान सर्वांनी ठेवावे. या नियमांची अंमलबजावणी करण्यात स्थानिक प्रशासनानेही कृपा करुन कोणतीही ढिलाई दाखवू नये. ‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’ अशा अंतिम परिस्थितीतही सावधानता महत्त्वाची. इतकेच…
रोहित वाकडे,
संपादक, सा.लोकजागर, फलटण