नेहमीप्रमाणेच मला उद्या विधानसभा निवडणूकीसाठी (इलेक्शन सुट्या २०२४) जायचं होतं. गेल्या वेळीच्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सचिन ढोले साहेब निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने महिलांना त्याच्या सोयीने बूथ व घरी जाण्याची सोय असणार हे निश्चित होत. पण तरीदेखील १०-२० हजार कर्मचार्यांमध्ये १०-२० लोकांची गैरसोय होणं क्रमप्राप्त असतं, पण कदाचित त्या दहा-वीसमध्ये मी असेल तर म्हणून मी राहण्याच्या दृष्टीने बॅग भरत होते.
मी मतदान अधिकारी क्रमांक तीन असल्याने बॅलेट सोडणे ही मुख्य जबाबदारी माझ्यावर होती. तरीदेखील ही ड्युटी म्हणजे एक टीमवर्क असतं, त्यामुळे शाई लावण्याची जबाबदारी ही घ्यावी लागते आणि जास्त प्रमाणात शाई लागली तर बोटाची कातडी जाते. म्हणून मी एक हँडग्लोज बॅगमध्ये टाकला. तो टाकत असताना माझ्या मनात विचार आला. ट्रेनिंगमध्ये, गप्पांमध्ये हा विषय झाल्याने काही महिला भगिनी तयारीने येथीलही; परंतु उरलेल्याचं काय? किंवा पुरुष कर्मचारी यांचं काय? परत विचार आला ‘फर्स्ट एड किट’ तर असणारच आहे. म्हणून मी सहज ‘ओपीओ २५५ फलटण विधानसभा’ हा निवडणूक प्रक्रिया सुलभ होण्यासाठी साहेबांनी केलेल्या ग्रुपवर मेसेज टाकला. त्या साहित्यासोबत शाही लावण्यासाठी हँड ग्लोज मिळावा ही विनंती. माझ्यानंतर कराडच्या एका शिक्षकांनी विचारले, साहित्य जमा करून परत येण्यासाठी बस आहे का? साहेबांनी लगेच त्यांना हो असा रिप्लाय दिला. आधी मला थोडं गिल्टी फील झालं. अगदी शुल्लक गोष्टीसाठी आपण मागणी केली. हे चुकलं तर नाही ना? पण एका मनानं असं समजावं. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची अतिशय जबाबदारीचे आणि धोक्याची ड्युटी पार पाडण्यासाठी नेमलेल्या व्यक्ती त्या दोन दिवसांची ड्युटी अत्यंत काळजीपूर्वक करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीजण तर अक्षरश: धास्ती घेतात, या ड्युटीची. निवडणुकीसाठी होत असलेला वारेमाप खर्च पाहता हँड ग्लोजचा खर्च म्हणजे अगदी शुल्लक आणि सर्वांच्या गरजेची आणि उपयोगाची आहे. चला जाऊ द्या, अशी मनाची समजूत काढून बॅग आटोपली.
आज सकाळी नेहमीप्रमाणे गोडाऊन हॉलच्या तिथे तो भव्य मंडप, मंडप बाहेर रुचकर नाश्त्याची सोय, पाण्याचे जार, मंडपाच्या प्रवेशद्वारात अटेंडन्स, चांगल्या क्वालिटीचे आय कार्ड, पुढे मंडपात व्यासपीठाशेजारी सर्व आरक्षित कर्मचारी, व्यासपीठावर उभे राहून (पाच पाच तासांची आठ प्रशिक्षणे पार पाडून) आज पुन्हा शेवटच्या प्रशिक्षणासाठी उभे असलेले साहेब, तोच आवाज, तीच भाषाशैली, कधी धमकीचा दंडुका तर कधी विनोदाची झालर. पण सरतेशेवटी सारं हेच की, काम व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे करा. टेन्शनने शुगर लेवल कमी झाली तर लेमनच्या गोळ्या सुद्धा किटमध्ये पुरवल्यात. त्या खा, पण टेन्शन घेऊ नका आणि जागा सोडू नका. असं सांगणारे साहेब प्रत्येक टीम बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, ना गडबड, ना गोंधळ. प्रत्येकाच्या चेहर्यावर सोयीचं बूथ मिळाल्याचे समाधान. सगळं कसं सुरळीत, सुरक्षित आणि शिस्तीत.
हसत हसत लाल परीने प्रवासाचा आनंद माझ्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. पाच किलोमीटर अंतरावरचे प्राधान्यक्रम दिलेले पहिलेच बूथ मिळाले. बुथवर गेल्यावर बूथ मॅनेजमेंटसाठी एक एक साहित्य सर्वजण पाहत होतो. ते सीयू, व्हीव्हीपॅट, ते सर्व वेगवेगळे बोर्ड, सील्स, ऍड्रेस टॅग, स्पेशल टॅग अगदी नव्याने ओळख करून घेत होतो आणि अचानक मला हॅन्ड ग्लोज दिसला. वाव किती आनंद झाला! आनंद त्या हॅन्ड ग्लोजचा नाही, त्या कर्तव्यदक्ष भावनेचा, त्या कर्तव्यपरायण कृतीचा, त्या प्रवृत्तीचा….आणि विं दा करंदीकरांची त्या ओळी तोंडातून बाहेर पडल्या,
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी ॥भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी ॥वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे ॥रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे ॥देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे ॥घेता घेता एक दिवस
देणार्यांची हात घ्यावे…॥
- श्रीम. अहिल्या कृष्णात भोजने,
उपशिक्षिका, जि. प. प्राथमिक शाळा,
भिवरकरवाडी, ता. फलटण, जि. सातारा