खटावच्या पूर्व भागाला तारळीच्या पाण्याची आस


आठ दिवसात पाणी न  सोडलेस शेतकर्‍यांचा आक्रमक पवित्रा

स्थैर्य, कातर खटाव, दि. 31 : खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील दहा ते पंधरा गावांच्या पाण्यासाठी तारळी योजेनतून पाणी मिळते. हा कॅनॉल पुर्ण होण्यासाठी तब्बल २५ वर्षाचा कालावधी लागला. आता कॅनॉलचे काम पुर्ण झाले आहे. मात्र उरमोडी, टेंभू व तारळीच्या अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने कॅनॉलला पाणी सुटले नाही. सद्या तारळीच्या लाभ क्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. तर पाण्याअभावी ऊस व जनावरांच्या चार्‍याची पिके जळून चालली आहेत. येत्या आठ दिवसात कॅनॉलला पाणी सुटले नाही तर शेतकरी आक्रमक आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तब्बल एक हजार ६१० दहा कोटी निधी खर्च करुन तारळीचा प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पातून खटाव व माण तालुक्यांतील एकूण आठ हजार ८७६  हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चार वेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व २६ किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे धोंडेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी, अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा शेती पाणीप्रश्न मिटणार आहे. या वर्षी शेतकर्‍यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. याबाबत मार्च २०२० मध्ये वरीलपैकी बहुतांशी ग्रामपंचायतीने ठराव करुन संबंधित अधिकार्‍यांना पाठविले आहेत. मात्र, अधिकार्‍यांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाल्याने पाणी शेतात खळाळले नाहीच. त्यास उरमोडी-तारळी प्रकल्पांचे अधिकारी व कालवा सल्लागार समिती ताळमेळ नसल्यामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

खटावपूर्व भागात शेतकरी पैसे भरण्यासाठी तयार असताना अधिकार्‍यांची वरची लेव्हल, त्यांच्या बोलण्यातून त्यांना माणला जाणवणारी तीव्रताही जादा दिसून येत आहे. त्यामुळेच हे पाणी खटावकरांना मिळण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उरमोडीचे पाणी माण तालुक्याला देण्याचे काम सुरू आहे. माण तालुक्याला अद्याप वीस दिवस उरमोडीचे पाणी सोडले जाणार आहे. वीस  दिवसानी पाणी येईपर्यंत एक तर शेतातील पिकाची पुर्णपणे होळी झाली असेल नाहीतर मान्सुनचा पाऊस सुरु झाला असेल. तारळी योजनेचे पाणी या उरमोडीच्या कॅनॉलमधून पुर्व भागातील गावांना दिले जाते. पाणी योजनेची नांवे दोन आहेत. मात्र उरमोडीचे जे पाणी सांगली जिल्ह्याला दिले जाते. त्याऐवजी सांगली जिल्ह्याला तारळीचे तर खटाव-माणला तारळी ऐवजी उरमोडीचे पाणी असे साटेलोटे आहे. मात्र उरमोडीचे अधिकारी माणदेशी दबावामुळे खटावच्या पूर्व भागाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. तर पाण्यासंदर्भात लढा उभा करणार्‍या नेतृत्वास शेतकरी व जनतेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्या कारणाने खटाव तालुक्यातील नेतेमंडळीकडूनही या प्रश्नाकडे टाकली सांड होत असल्याची चर्चा आहे. अश्या परस्थितीत आता सर्वसामान्य शेतकरी व गांव पातळीवरील कार्यकर्तेच पाटबंधारे प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या मानसिकतेत आहेत.

अन्यथा शेतकरी कायदा हातात घेतील…….आमच्या बाजूने उरमोडीचे पाणी जात असेल व अधिकारी वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी सांगून जनतेची दिशाभूल करत असतील तर पूर्व भागातील शेतकरी आक्रमक होवून कायदा हातात घेतील. तारळीचा पाट खोदण्याबरोबर अधिकार्‍यांना फिरकुही दिले जाणार नाही. असा इशारा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, धोंडेवाडीचे सरपंच हणमंतराव भोसले, सुर्याचीवाडीचे रामचंद्र घोलप, एनकुळचे संतोष ढोले व राजेंद्र खाडे, दातेवाडीचे सदाशिव हांगे यांनी दिला आहे.

नेतेमंडळींनी एकी दाखविण्याची वेळ

खटाव तालुक्याच्या पूर्व  भागाच्या अस्तित्वाचा हा  विषय आहे. त्यामुळे तारळीच्या पाणी प्रश्नासंदर्भात ‘ सांगली पॅटर्न ’ प्रमाणे निमसोडचे मोरे-देशमुख, मायणीचे गुदगे-येळगांवकर, तसेच तालुका पातळीवर काम करणार्‍या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी या प्रश्नासंदर्भात एकी दाखवावी. निवडणूकीच्या वेळी आपापले पक्ष, गट-तट जरुर शाबुत ठेवावेत. असा आर्त सूर गावोगावच्या शेतकर्‍यांतून येत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!