दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराची मदत शासनाकडून मिळत आहे. हे फॉर्म ऑनलाईन भरायचे आहेत. कॉम्प्युटर निरक्षर असल्यामुळे किंवा माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे किंवा त्यांचीआर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहत आहेत. तेव्हा हे अर्ज ऑनलाइन भरून न घेता ते ऑफलाइन भरून घ्यावेत व याची अंमलबजावणी तहसीलदारांच्या मार्फत तालुका पातळीवर करण्यात यावी. ज्यामुळे समाजातील एक ही घटक यापासून वंचित राहणार नाही, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी जिल्हाउपाध्यक्षा वैशाली सुतार उपस्थित होत्या.
गेली दोन वर्ष सर्वजण कोरोना महामारीला तोंड देत आहोत. कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबात मृत्यू झालेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये करोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा मोठा आहे. मृत व्यक्तींच्या कुटूंबातील नातेवाईकांना आधार म्हणून शासन प्रत्येकी पन्नास हजार रुपये देत आहे हे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत. परंतु अनेक घटक यामुळे वंचित राहत आहेत.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार हे अर्ज ऑफलाइन करता येतात. तेव्हा हे अर्ज ऑफलाईन भरण्याची सुविधा जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा यांनी उपलब्ध करून द्यावी व योजना तहसीलदारांमार्फत तालुका पातळीवर राबवावी जेणेकरून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत याचा लाभ घेता येईल यासंबंधीच्या सूचना पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना द्याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
कोरोना महामारीच्या काळात अनेक खाजगी हॉस्पिटल्सनी कोरोना पेशंटना वाढीव बिले लावली होती. त्याचा परतावा मिळावा म्हणून शासन निर्णय 21 जानेवारी 2022 यानुसार ऑडिट करून वाढीव बिले लावलेल्या हॉस्पिटल्सकडून करोना पेशंटला वाढीव बिलांचा परतावा मिळणे गरजेचे होते. परंतु, या योजनेपासून अनेक घटक वंचित राहिले आहेत. या योजना गरीब वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी सातारा यांना सूचना कराव्यात अशी मागणी पालक मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे कविता म्हेत्रे यांनी केली.