स्थैर्य, कोळकी दि.9 : फलटणचे उपनगर म्हणून मोठ्या झपाट्याने विस्तारणार्या कोळकी गावामध्ये मोठ्या शहरांप्रमाणे मुलभूत सुविधांची आवश्यकता भासत आहे. आजवर ग्रामस्थांना सुविधा पुरवण्यात ग्रामपंचायत ज्याप्रमाणे यशस्वी ठरली आहे त्याचपद्धतीने बदलत्या काळातही सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यासाठी राजे गट सक्षम आहे. आगामी काळात कोळकीचा विकास राजे गटाकडून केवळ शक्य आहे, अशा शब्दात ग्रामपंचायत निवडणूकीतील प्रभाग क्रमांक 3 चे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे अधिकृत उमेदवार संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण मतदारांना आश्वस्त करीत आहेत.
कोळकी ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराला वेग आला असून उमेदवारांनी आपापल्या प्रभागातील मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी – भेटींवर जोर दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मधील मालोजीनगर परिसरातील हनुमानमंदीर, सटवाईमाळ, इरिगेशन कॉलनी भागातील मतदारांशी संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण ‘हाऊस टू हाऊस’ संपर्क साधत आहेत.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली फलटण तालुक्यात अखंड विकास सुरु आहे. विकासाच्या या प्रक्रियेत आपणही कुठे मागे राहता कामा नये. त्यामुळे गावाच्या भवितव्यासाठी ग्रामपंचायतीची सत्ता सुरक्षित हातात मतदारांनी सोपवावी, असे सांगून मतदारांनी आपला कौल राजे गटाच्या उमेदवारांच्या बाजूने द्यावा, असेही आवाहन संजय कामठे, सौ.रेश्मा देशमुख व सौ.रुपाली चव्हाण मतदरांना करीत आहेत.