“कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून असतो”. एखाद्या देशाला पुढे आणि मागे ढकलण्यात लोकसंख्येचा वाटा हा मोठा असतो.
संपूर्ण जगात ११ जुलैला ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा केला जातो. या निमित्ताने अनियंत्रित लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले जाते आणि त्यावर विचार विनीमय केला जातो.
या वर्षीच्या (२०२४) लोकसंख्या दिनाची थीम आहे; ‘वाढत्या जागतिक लोकसंख्येसह, वाढत्या समस्या‘
जागतिक लोकसंख्या दिनाचा इतिहास:
जागतिक लोकसंख्या दिनाची सुरूवात संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने १९८९ मध्ये केली होती.
११ जुलै १९८७ रोजी जगातील पाच अब्जावे बालक युगोस्लाव्हिया या देशात जन्माला आले. अखेर याची युनोने पण दखल घेऊन १९८९ सालापासून हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून घोषित केला आणि त्यानंतर वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंब नियोजनाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तेव्हापासूनच ‘जागतिक लोकसंख्या दिन’ दरवर्षी साजरा केला जात आहे. यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येविषयी जनमानसात जागृती निर्माण झाली. .
११ जुलै, १९९० रोजी हा दिवस पहिल्यांदा ९० पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात आला.
‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यासाठी सुमारे ८ उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत;
१. वाढत्या लोकसंख्येची जाणीव समाजाला करून देणे हा लोकसंख्या दिन साजरा करण्याचा पहिला उद्देश आहे.
२. अनेकांना वाटतं की मुलगा असेल तर संतती पुढे चालेल, या इच्छेतून अनेक मुलांना जन्म देऊन लोकसंख्या वाढवली जाते, ती कमी करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जाते.
३. हा दिवस मुला-मुलींच्या संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी साजरा केला जातो.
४. लोकांना त्यांच्या समानतेची जाणीव करून दिली जाते.
५. हा दिवस पाळल्याने लोकांमधील लिंगभेद कमी होईल.
६. लहान वयातच महिलांना माता होण्यापासून रोखण्यासाठी त्यांना या दिवशी प्रबोधन केले जाते.
७. लोकांना त्यांच्या हक्कांबरोबरच कर्तव्याचीही आठवण करून दिली जाते.
८. चांगले शिक्षण, आरोग्य आणि जीवनशैलीसाठी लोकसंख्या कमी करणे आवश्यक आहे हे पटवून देण्याकरता हा दिवस महत्वाचा आहे.
जागतिक लोकसंख्या दिन कसा साजरा केला जातो?
वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्यासाठी, मोठ्या संख्येने लोकांचे लक्ष वेधण्यासाठी विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिवस आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो.
यामध्ये परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा, शैक्षणिक स्पर्धा, माहिती सत्र, निबंध लेखन स्पर्धा, विविध विषयांवर पोस्टर स्पर्धा, भाषण, कविता, चित्रकला, घोषवाक्य, व्याख्यान, वादविवाद स्पर्धा, यासारखे विविध उपक्रम समाविष्ट आहेत.
पत्रकार परिषदा, टीव्ही आणि वृत्तवाहिन्यांद्वारे बातम्यांचा प्रसार करणे, रेडिओ आणि टीव्हीवरील लोकसंख्येशी संबंधित कार्यक्रम, इ. विविध आरोग्य संस्था आणि लोकसंख्या विभाग, परिषदा, संशोधन कार्य, बैठका, प्रकल्प विश्लेषण, इत्यादी आयोजित करून लोकसंख्येच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्रित कार्यक्रम करावेत.
या विशेष जनजागृती महोत्सवाच्या माध्यमातून, कुटुंब नियोजनाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, आई आणि बालकांचे आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचा अधिकार, लैंगिकता यासारख्या गंभीर विषयांवर लोकसंख्येच्या समस्यांबद्दल जाणून घेण्यासाठी, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी, शिक्षण, गर्भनिरोधकांचा वापर आणि संरक्षणात्मक उपाय, प्रजनन आरोग्य, तरुण गर्भधारणा, मुलींचे शिक्षण, बालविवाह, १५ ते १८ वर्षांच्या किशोरवयीन मुलांमधील लैंगिकतेचा प्रश्न सोडवणे खूप महत्वाचे आहे यावर चर्चा केली जाते.
राष्ट्राच्या विकासात हातभार:-
लोकसंख्या ही एक साधनसंपत्ती आहे. त्याचा जर योग्य वापर करता आला तर तो देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. अहवालानुसार आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. तरुणांचा देश म्हणूनही भारत ओळखला जातो आहे. एकूण लोकसंख्येच्या जवळपास ५० % पेक्षा जास्त लोकसंख्या ही २५ पेक्षा कमी वय असणारी तर ३५ पेक्षा कमी वय असणारी लोकसंख्या ही जवळपास ६५ % च्या वर आहे.
भारताने २०२३ मध्ये लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकले आहे. सध्या २०२४ मध्ये भारताची लोकसंख्या १४४ कोटीच्या वरती पोहोचली आहे. भारत सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन आणि कल्याणकारी कार्यक्रमांसारखे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. परंतु, वाढलेल्या लोकसंख्येचा प्रभावीपणे वापर केल्यास काही सकारात्मक गोष्टी देशाच्या विकासाच्या बाबतीत निश्चितच घडू शकतात.
भारत: लोकसंख्या आणि लोकसंख्या वाढीचा दर (१९०१ ते २०११)
वर्ष | लोकसंख्या (दशलक्ष) | वार्षिक वाढीचा दर | % दशकातील वाढीचा दर |
1901 | 238.4 | – | – |
1911 | 252.1 | 0.56 | 5.8 |
1921 | 251.3 | – 0.03 | 0.3 |
1931 | 279.0 | 1.04 | 11.0 |
1941 | 318.7 | 1.33 | 14.2 |
1951 | 361.1 | 1.25 | 13.3 |
1961 | 439.2 | 1.96 | 21.6 |
1971 | 548.1 | 2.20 | 24.8 |
1981 | 683.3 | 2.22 | 24.7 |
1991 | 843.3 | 2.14 | 23.9 |
2001 | 1027.0 | 1.93 | 21.5 |
2011 | 1210.2 | 1.64 | 17.6 |
स्त्रोत: भारताची जनगणना आकडेवारी, १९०१-२०११
लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी तयार केलेली काही घोषवाक्ये:
१) कुटुंब असेल लहान, तरच होईल मेरा भारत महान.
२) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.
३) कुटुंब लहान, सुख महान.
४) कुटुंब नियोजनात कसूर, लोकसंख्येचा भेसूर‘.
५) करूया कुटुंबाचे नियोजन, आनंदी राहू प्रत्येक जण.
सध्या जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्जांच्या पुढे गेली आहे आणि त्यामुळे अनेक दुष्परिणामही दिसून येत आहेत. जगातील वाढत्या ग्लोबल वार्मिंगमुळे पर्यावरणात झपाट्याने बदल होत आहेत. मानवी लोकसंख्येवर याचा परिणाम दिसून येत आहे. लोकांना आरोग्य, शिक्षण यासह अनेक समस्या भेडसावत आहेत, अशा परिस्थितीत जागतिक लोकसंख्या दिनाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाला चालना देणे महत्त्वाचे आहे.
प्रा. डॉ. आशिष जाधव,
भूगोल विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण
मोबा. ९५५२८५८८१८