स्थैर्य, खटाव,दि २७: वडी ता. खटाव येथे 2 ते 4 एप्रिल अखेर होणारा हिंदू- मुस्लिम धार्मिक ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीर हजरत लाडलेमशायक अन्सारी यांचा उरुस कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.
वडी येथे उरुसानिमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सपोनि उत्तमराव भापकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उरुस कमेटीचे सदस्य ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
दरवर्षी तीन दिवस उरुसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. माहेरवाशीण महिलासह हजारो भाविक उपस्थित राहतात. यंदा पुन्हा कोरोनाचे संकट डोक्यावर असल्याने प्रशासनाने उरुस यात्रा साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार पारंपरिक पद्धतीने धार्मिक विधी गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन साध्या पध्दतीने करण्यात येणार आहेत. उरुसानिमित्त आयोजित करण्यात येणारे सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला. यात्रा उत्सव गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊन प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे साजरे करुन कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सपोनि उत्तम भापकर यांनी केले.तरी भाविकांनी याची नोंद घेऊन उरुस कमेटी आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.