रखडलेल्या अकरावी प्रवेशाचा निर्णय येत्या 2 दिवसांत घेणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२: राज्यातील अकरावीच्या रखडलेल्या प्रवेश प्रश्नाबाबत येत्या एक-दोन दिवसात निर्णय होईल. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी साेमवारी दिली.

“राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रवेश झाले आहेत. मुले घरी आहेत, त्यांचा अभ्यास सुरू व्हावा म्हणून ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. पण ज्यांचे प्रवेश झाले नाहीत त्यांनी या क्लासेसचा लाभ घेता येईल,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“यंदा दहावीच्या परीक्षेत १८ लाख विद्यार्थी पास झाले आहेत. त्यातील ११ लाख विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिला आहे. उर्वरित सात लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश लवकरच सुरू होतील,” असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील शाळा या कधी सुरू होणार याबाबत अजून तरी संभ्रमच दिसत असल्याचे सध्या तरी चित्र आहे. राज्यातील कोरोना महामारीमुळे गेल्या सहा महिन्यापासून शाळा बंद आहेत. खासगी शाळांतील शिक्षकांचे वेतन रखडले आहे.

खासगी कोचिंग चालक, पालक राज ठाकरेंकडे

पालक संघ आणि कोचिंग क्लासेस मालक – शिक्षकांचे शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोमवारी भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर ही भेट झाली. या वेळी राज ठाकरे यांनी कोचिंग क्लास चालक आणि पालकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांचे निवेदनही स्वीकारले. या मागण्या सरकार दरबारी मांडा, अशी विनंतीही या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे मांडली. त्यानंतर थेट पालकांसमोरच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावून अकरावी प्रवेशाची समस्या मांडली. या वेळी संध्याकाळी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची आमची चर्चा होणार आहे. उद्या सकाळपर्यंत तुम्हाला त्याबाबतची माहिती देते, असे गायकवाड यांनी सांगितले. त्यावर राज यांनी अकरावी प्रवेशाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असे त्यांना सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!