गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरांच्या आवळल्या मुसक्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 13 : सातारा शहर पोलिस ठाण्याच्या डी. बी. शाखेने मोबाईल शॉपी, मटन शॉपमधून बोकड चोरी आणि दुचाकी चोरी अशा तीन गुन्ह्यांचा छडा लावला आहे. यापेकी मोबाईल व बोकड चोरीप्रकरणात राहुल ज्ञानदेव रावते वय 25 रा.सोनावडे, ता.जुन्नर सध्या रा. रविवार पेठ सातारा आणि शाशिकांत आनंदा शिंदे वय 30 वर्षे रविवार पेठ सातारा मुळ रा. रांजणगाव, ता. शिरूर यांना अटक केली आहे. तर दुचाकी चोरीप्रकरणी एक अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. 30 मे रोजी रविवार पेठ, कासट मार्केट येथील जय श्रीराम या टपरीवजा मोबाईल शॉपीचा पत्रा उचकटून मोबाईल व इतर मोबाईल अ‍ॅक्सेसरीज चोरून नेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात झाली होती. याप्रकरणी सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख आणि वरीष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कदम यांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेत होते. दि. 10 जून रोजी एक संशयीत मसूर, ता. कराड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोनि. आण्णासाहेब मांजरे यांच्या आदेशान्वये डीबी पथकाने मसूर येथून संशयीतास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने रविवार पेठेतील मोबाईल दुकान मित्रांच्या सहाय्याने फोडून मोबाईल चोरल्याचे कबुल केले. त्यानंतर दुसर्‍या साथीदारास सातार्‍यातून ताब्यात घेतले. दोन्ही संशयीतांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवस पोलीस कोठडी मिळाली.

पोलीस कोठडीतील असताना त्यांच्याकडून चोरीस गेलेले 12 मोबाईल, ब्ल्युटुथ स्पिकर, हेडफोन व इतर साहित्य हस्तगत केले आहे. दरम्यान, संशयीतांनी सातार्‍यातील पैलवान मटण शॉप येथून बोकड चोरल्याची कबुली दिली आहे. त्याबाबतही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, दि.11 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना दुचाकी चोरी प्रकरणातील एक अल्पवयीन मुलगा चारभिंती परीसरात दिसून आला. त्याच्याजवळ असलेल्या दुचाकीची कागदपत्रे मागितली असता त्याने सदरबझार परीसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले. ही दुचाकी पोलिसांनी जप्त करून गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील,  उपविभागीय पोलीस अधिकारी   समीर शेख, पोनि आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कदम, शेवाळे, भिसे, चव्हाण, साबळे, घाडगे, कचरे, तारळकर, धुमाळ, भोंग यांनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!