दैनिक स्थैर्य | दि. ०७ नोव्हेंबर २०२४ | फलटण | राज्यात महाविकास आघाडी,महायुती या प्रमुख आघाड्या, त्यासोबत तिसरी आघाडी व वंचित अशी प्रमुख लढत असून आता सर्वसाधारणपणे सर्व आघाड्या व पक्षांनी प्रचाराला जोरदारपणे सुरुवात केली आहे.अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २५५ फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ही चौरंगी लढत होत असल्याचे दिसून येत आहे.
आघाडी व युती या प्रमुख आघाड्यांना शह देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने दिगंबर आगवणे यांना मैदानात उतरवले असून स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष, परिवर्तन महाशक्ती आघाडी व संविधान समर्थन समितीच्या वतीने प्रा. रमेश आढाव हे मैदानात उतरलेले आहेत. वंचित कडून फलटण मध्ये पहिल्यांदाच मातंग समाजातील सचिन भिसे यांना ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मैदानात उतरवले आहे.
बौद्ध समाजाने उमेदवार दिल्याने महायुती व महाविकास आघाडी यांचे बौद्ध समाजाला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु बौद्ध समाजाचा ‘एक निर्धार बौद्ध आमदार’ या संकल्पापुढे त्यांचा निभाव लागत नाही. त्यामुळे काहीही करून बौद्ध समाजाला वळवण्यासाठी बौद्ध समाजातील कार्यकर्ते, नेते यांना आमिष दाखवून आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हेच नेते बौद्ध समाजात काही फुटीरवादी कार्यकर्ते, नेते यांना आपल्या सोबत घेऊन संपूर्ण समाज आपल्यासोबत असल्याची वल्गना करत आहेत.परंतु बौद्ध समाजाच्या वतीने प्रा.रमेश आढाव हे समर्थ उमेदवार असल्याने महाविकास आघाडी व महायुतीची कोंडी झाली आहे. प्रा.रमेश आढाव हे पत्रकार म्हणून व सामाजिक व राजकीय विश्लेषक म्हणून सर्व तालुक्याला सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत निर्भीडपणे जनसामान्यांचे प्रश्न पत्रकारितेच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यामुळे बौद्ध समाज निश्चितपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा आजचे चित्र आहे. या चौरंगी लढतीमुळे मताचे विभाजन होणार आहे हे निश्चित असल्यामुळे प्रत्येक मत किती महत्त्वाचे आहे हे महाविकास आघाडी व महायुतीला माहिती आहे आणि त्यामुळे बौद्ध समाज आपल्याकडे कसा येईल या दृष्टीने त्यांनी प्रयत्न चालू ठेवले आहेत.
बौद्ध समाजातील नेते कार्यकर्ते यांनीही विचारपूर्वक पावले उचलून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली मते व भूमिका स्पष्ट करावी जेणेकरून इतर उमेदवाराला त्याचा फायदा होऊ नये. समाजाची एकजूट ही आजच्या घडीला खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे समाजाने अधिकृतरित्या दिलेल्या उमेदवाराला त्याचा फायदा व्हावा आणि त्यामुळेच विजयश्री खेचून आणण्यामध्ये समाजाने आपले योगदान द्यावे.
आज बौद्ध समाजाला स्वायत्त राजकारण करण्यासाठी आपल्या समर्थ उमेदवाराला निवडून आणण्याची गरज आहे. ज्या ज्या पक्षाकडे बौद्ध समाजाने अगदी विवेकी पद्धतीनं योग्य मार्गाने मागणी करूनही त्यांच्या मागणीला कुठलाही पाठिंबा न देणाऱ्या पक्षांनी यावेळेस बौद्ध समाजाला गृहीत धरू नये. आजपर्यंत बौद्ध समाजाने लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये याच प्रस्थापित पक्षांना भरघोस मतांनी विजयी करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
तरीही आपण त्यांना उमेदवारी नाकारून बौद्ध समाजाला आपल्या राजकीय हक्कांपासून वंचित ठेवण्याचे काम केला आहे. म्हणून यावेळी बौद्ध समाजाला महाविकास आघाडी व महायुतीने व इतर कोणत्याच पक्षाने गृहीत धरू नये. ही लढाई बौद्ध समाजाच्या अस्तित्वाची व स्वाभिमानाची आहे. त्यामुळे कोण कुठे जातो? कोण कोणत्या पक्षासोबत उभा आहे हे बौद्ध समाज पाहत नाही.
महायुती व महाविकास आघाडी या प्रस्थापित पक्षांनी बौद्ध समाजाला उमेदवारी न देता हातची संधी घालवली आहे. तेव्हा बौद्ध समाजातील चार दोन कार्यकर्ते सोबत घेऊन बौद्ध समाज आपल्या सोबत असल्याचे भासवू नये. त्यांना याचा काहीही फायदा होणार नाही. तेव्हा प्रस्थापित पक्षांनी यावेळी बौद्ध समाजाला गृहीत धरू नये.