स्थैर्य, मुंबई, दि. १४: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. भाजप या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने थेट शिवसेना मंत्र्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केले आहेत. यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘या प्रकरणी व्यवस्थित चौकशी करण्यात येईल आणि जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल. त्यामध्ये ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल, त्यांच्यावर कारवाई देखील केली जाईल’ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तर असाही प्रयत्न होता कामा नये व याचबरोबर सत्य लपवण्याचाही प्रयत्न होता कामानये. तसे होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या प्रकरणात सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाईल. त्यानंतर ज्यांच्यावर कारवाईची गरज असेल ती कारवाई करु’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
काय आहे प्रकरण?
बीड जिल्ह्यातील परळी येथील 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी पुण्यातील वानवडी भागात आत्महत्या केली. या तरुणीच्या आत्महत्येस महाराष्ट्र विकास आघाडी सरकारातील एक कॅबिनेट मंत्री जबाबदार असल्याची चर्चा आहे. पूजा ज्या व्यक्तीशी बोलत आहे, अशा अनेक ध्वनिफिती समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या आहेत. त्यासंदर्भात फडणवीस यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना पत्र लिहिले. तसेच ध्वनिफिती जोडल्या आहेत. या ध्वनिफितीमध्ये पुरुषी आवाज कोणाचा आहे, ती व्यक्ती काय बोलते, या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीने पूजाला आत्महत्या करण्यास भाग पाडले काय, यासंदर्भात सर्वंकष चौकशी करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
संजय राठोड यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंदवा : चित्रा वाघ यांची मागणी
पूजा चव्हाण आत्महत्येस जबाबदार संजय राठोड यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी केली. यासदंर्भात समाजमाध्यमांवर वाघ यांनी ध्वनिचित्रफीत टाकली असून पूजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. पूजाचा मोबाइल व लॅपटाॅप दरवाजा तोडून ताब्यात घ्या, असे हे मंत्री तिच्यासोबतच्या मित्रास का सांगत आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.