स्थैर्य, सातारा, दि. १७: प्लेगच्या निमित्ताने पुण्यातील जनतेवर अत्याचार करणारा अधिकारी रँड याला दामोदरपंतांनी गोळ्या घातल्या. त्या वेळी आयर्स्ट या अधिकार्याला बाळकृष्णांनी गोळ्या घातल्या. या प्रकरणी फितुरी करणार्याला वासुदेवांनी संपवले. या चाफेकर बंधूंना इंग्रजांनी फाशी दिले. या तीन सख्या भावांनी राष्ट्रकार्यासाठी बलीदान दिले.
क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून चाफेकर बंधूंनी प्रतिदिन बाराशे सूर्य नमस्कार घालणे आणि एका तासात अकरा मैल पळण्याचाही वेग प्राप्त करणे
दामोदर हरि चाफेकर यांचे घराणे मूळचे कोकणातील वेळणेश्वरचे; मात्र त्यांचे पूर्वज पुण्याजवळील चिंचवडला येऊन स्थायिक झाले. तेथेच २५.६.१८६९ या दिवशी दामोदरपंतांचा जन्म झाला. लहानपणापासूनच दामोदरपंत आणि त्यांचे दोन्ही बंधू बाळकृष्ण आणि वासुदेव यांचा ओढा हिंदुस्थानला परदास्यातून मुक्त करण्याकडे होता. क्रांतीकार्याची आवश्यकता म्हणून ते प्रतिदिन बाराशे सूर्य नमस्कार घालीत, तसेच एका तासात अकरा मैल पळण्याचाही वेग त्यांनी प्राप्त केला होता.
दामोदर आणि बाळकृष्ण यांनी राणी व्हिक्टोरियाच्या मुंबईतील पुतळ्याला डांबर फासून जोड्यांची माळ घालणे
दामोदर पंतांचे वडील हरिभाऊ यांचा प्रत्येक चातुर्मासात मुंबईला जाऊन प्रवचने करण्याचा प्रघात होता. १८९६ च्या चातुर्मासात वडिलांबरोबर साथीला गेलेल्या दामोदर आणि बाळकृष्ण यांनी तेथील राणी व्हिक्टोरियाच्या पुतळ्याला डांबर फासून जोड्यांची माळ घातली. या काळात काँग्रेसच्या अधिवेशनांचा प्रारंभ ब्रिटिशांच्या राणीच्या स्तवनाने होत असे, हे माहीत असलेल्यांना या धाडसी कृत्याचे मोल कळेल !
सन्नीपात (प्लेग) रोगाच्या निमित्ताने इंग्रज अधिकारी रँडने नागरिकांवर अत्याचार करणे
१८९६ साली ग्रंथिक सन्नीपात (प्लेग) हा रोग पुण्यात झपाट्याने पसरू लागला. सरकारने या साथीचा बंदोबस्त करण्यासाठी ‘रँड’ नावाच्या आय.सी.एस्. अधिकार्याची नेमणूक केली. त्याचे गोरे सैनिक घरे तपासण्याच्या निमित्ताने नागरिकांवर अत्याचार करू लागले.
बाळकृष्णानी वासुदेवरावांची ‘गोंद्या आलाऽ रे आला…’ ही परवलीची आरोळी ऐकून आयस्र्टला आणि पुन्हा तीच परवलीची आरोळी ऐकू आल्याने दामोदरपंतांनी रँडला ठार मारणे
पुण्यातील हे अत्याचार चाफेकर बंधूंच्या अंत:करणात प्रतीशोधाची आग पेटवत गेले. रँडचा सूड घेण्याची संधी चाफेकर बंधूंना लवकरच मिळाली. १८९७ हे वर्ष राणी व्हिक्टोरियाच्या राज्यकारभाराचे ६० वे वर्ष होते. त्या निमित्ताने पुण्यातही गणेश खिंडीतील राजभवनावर एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. २२.६.१८९७ या रात्री गणेश खिंडीतील समारंभ आटोपल्यावर रँड आणि आयस्र्ट आपापल्या स्वतंत्र घोडागाड्यांतून निघाले. आयस्र्टची घोडागाडी पुढे होती. वासुदेवरावांची ‘गोंद्या आलाऽ रे आला… ’ ही परवलीची आरोळी ऐकताच आणि रँडसारखी दिसणारी आयस्र्टची घोडागाडी दिसताच बाळकृष्ण चालत्या घोडागाडीत शिरले आणि त्यांनी त्यांचे ‘रिव्हॉल्व्हर’ आयस्र्टच्या मस्तकात रिकामे केले.
तरीही लांबून येणारी परवलीची आरोळी थांबत नाही, हे कळताच दामोदरपंत काय ते समजले. बाळकृष्णपंतांनी हिरावून घेतलेली संधी परत मिळाल्याचा आनंदही त्यांना झाला. रँडच्या गाडीमागे धावणार्या वासुदेवरावांना थांबवून त्यांनी स्वत: गाडीवर उडी घेतली. छपरावरील पडदा बाजूला सारून त्यांनी पाठमोर्या रँडवर आपले रिव्हॉल्व्हर मोकळे केले. दामोदरपंत कार्यसिद्धीच्या आनंदात गाडीवरून खाली उतरले; पण दोन्ही घटना गाडीहाक्यांच्या ध्यानातच आल्या नाहीत.
द्रविड बंधूंच्या चुगलखोरीमुळे दामोदरपंत आणि बाळकृष्णपंत यांना, तर चुगलखोर द्रविडबंधूंना ठार मारल्याने सुदेवपंतांना फाशीची शिक्षा होणे.
काही महिन्यांनी द्रविड बंधूंच्या चुगलखोरीमुळे दामोदरपंत आणि बाळकृष्णपंत यांना पकडण्यात आले. त्यांच्यावर अभियोग चालून १८.४.१८९८ या दिवशी दामोदरपंतांना आणि १२.५.१८९९ या दिवशी बाळकृष्णपंतांना फाशी देण्यात आले. चाफेकर बंधूंची ही कहाणी एवढ्यावरच संपली नाही. द्रविड बंधूंच्या चुगलखोरीची माहिती कळताच धाकटे वासुदेवपंत संतप्त झाले. महादेव रानडे नावाच्या मित्राच्या साहाय्याने त्यांनी चुगलखोर द्रविडबंधूंना ठार मारले आणि ८.५.१८९९ या दिवशी ते स्वत: फासावर चढले.
रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे वय होते २७ वर्षे, मधल्या बाळकृष्णपंतांचे वय होते २४ वर्षे आणि धाकट्या वासुदेवरावांचे वय होते १८ वर्षे ! या विशी-पंचवीशीतील तरुणांचा असीम त्याग आणि शौर्य पाहून आजही उर अभिमानाने भरून येतो ! तीन सख्या भावांनी राष्ट्रकार्यासाठी केलेले हे बलीदान जगात एकमेव आहे !
राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी प्रतिदिन बलोपासना करण्याचा चाफेकर बंधूंचा आदर्श आपणही जोपासूया. चाफेकर बंधूंना विनम्र अभिवादन !
संकलक : श्री. राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती