स्थैर्य, औंध, दि. ०४: औंध ता खटाव येथील केदारेश्वर मंदीरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्याचा सुमारे 35 शेतकऱ्यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करु नये अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांचेसह शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांचेकडे केली आहे.
गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2012-2013 साली कृषी विभागाने लोकांच्या मागणीवरून पाणी अडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत केदारेश्वर मंदीरानजीकच्या ओढ्यावर सिमेंट नालाबांध बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे सुमारे 15 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. शिवाय सहा विहरी आणि 13 बोअरवेल यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे या बंधाऱ्याचा लाभ महारकी शिवारातील सुमारे 35 शेतकऱ्यांना होत आहे. परंतु काहीजण द्वेषापोटी बंधाऱ्याचा त्रास होत असल्याचे कारण पुढे करून सिमेंट बंधारा फोडण्याचा निर्लेखित करण्याची मागणी करीत आहेत. त्यांची मागणी धांदात खोटी आणि शासनाची दिशाभूल करणारी आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून हा बंधारा निर्लेखित करु नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर 35 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा – शासनाच्या मंडल कृषी विभागाने सुमारे 9 लाख रुपये खर्च करून हा सिमेंट बंधारा बांधला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असताना कुणाच्या तरी मागणी वरुन हा बंधारा पाडल्यास शासनाचा खर्च पाण्यात जाईल आणि लाभधारक शेतकऱ्यांचे नुकसान होईल. शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करावा.