स्थैर्य, सातारा, दि.५: कास यवतेश्वर रोड वरील गणेश खिंड घाटातुन 40 फूट खोल दरीत चारचाकी कोसळून झालेंल्या अपघातात 25 वर्षीय युवतीचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. कोमल बापूराव पाटील वय (वर्ष 25) रा बोरखळ सातारा असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव असून प्राजक्ता दिलीप साबळे (वय २४) व अमर दीपक शिर्के (वय २४, दोघेही रा. मार्केट यार्डपरिसर सातारा) गंभीर जखमी झाले आहेत. जखमीना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. कोमलच्या मृत्यूने बोरखळ गावासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दिनांक 04 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 05.00 वा चे सुमारास मौजे अनावळे ता. जि सातारा गावचे हद्दीत गणेश खिंडीतील गणेश मंदिराजवळ, कास ते सातारा जाणारे रोडवर कार (एमएच 12 जीएफओ179) या कारचा अपघात झाला.
या बाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कास रस्त्यावरून गणेश खिंड परिसरातून कार जात होती. दरम्यान कार वरील नियंत्रण सुटल्याने कार चाळीस फूट दरीत कोसळली. या कारमधील एक युवती गाडीतून बाहेर फेकली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या कारमधील अन्य महिला व पुरुष गंभीर जखमी झाले. या जखमी अवस्थेत एक जण दरीच्या वर आला. यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली. सातारा पोलिस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्सनी घटनास्थळी धाव घेतली असून सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नंतर मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे नेहण्यात आल्याची माहिती आहे. कासला फिरायला आले असताना परत घरी येताना झालेल्या दुर्देवी अपघातात युवतीचा मृत्यू झाला.