
फलटण तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींमधील रिक्त असलेल्या २ थेट सरपंच आणि १५ सदस्य पदांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार असून, विडणी ग्रामपंचायतीच्या ९ जागांचाही यात समावेश आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 18 मार्च : फलटण तालुक्यातील ग्रामीण राजकारणाची धुरा पुन्हा एकदा तापणार आहे. निधन, राजीनामा, अपात्रता किंवा नामनिर्देशन पत्र न भरल्याने रिक्त झालेल्या राज्यातील ग्रामपंचायत सदस्य व थेट सरपंच पदांच्या पोटनिवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार फलटण तालुक्यातील तब्बल ८ ग्रामपंचायतींमधील १७ रिक्त जागांसाठी (२ थेट सरपंच आणि १५ सदस्य) ही पोटनिवडणूक पार पडणार आहे. येत्या २८ एप्रिल २०२६ रोजी यासाठी मतदान होणार असून, २९ एप्रिल रोजी मतमोजणीद्वारे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
प्रशासनाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंतच्या अद्ययावत माहितीनुसार रिक्त पदांचा गोषवारा तयार केला आहे. या निवडणूक कार्यक्रमामुळे गावोगावच्या राजकीय हालचालींना मोठा वेग आला असून, मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम (२०२६):
-
निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे: ३० मार्च (सोमवार)
-
नामनिर्देशन पत्रे (उमेदवारी अर्ज) दाखल करणे: ०७ एप्रिल ते १३ एप्रिल (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत – सुट्ट्यांचे दिवस वगळून)
-
अर्जांची छाननी: १५ एप्रिल (बुधवार)
-
अर्ज माघारीची अंतिम मुदत व चिन्ह वाटप: १७ एप्रिल (शुक्रवार, दुपारी ३ वाजेपर्यंत)
-
प्रत्यक्ष मतदान: २८ एप्रिल (मंगळवार, सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)
-
मतमोजणी व निकाल: २९ एप्रिल (बुधवार)
विडणी ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष; अपात्रतेवर स्थगिती नाही
या पोटनिवडणुकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे ते ‘विडणी’ ग्रामपंचायतीने. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार विडणी ग्रामपंचायतीचे तब्बल ९ सदस्य अपात्र ठरले होते. या अपात्र सदस्यांच्या प्रकरणाबाबत उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आलेले आहे; परंतु या प्रकरणाला न्यायालयाकडून अद्याप कोणतेही स्थगितीचे (Stay) आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या ९ रिक्त जागांसाठीही आता निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे.
उमेदवार मिळणार की पदे पुन्हा रिक्तच राहणार?
या निवडणुकीत आणखी एक अत्यंत कळीचा मुद्दा समोर आला आहे. फलटण तालुक्यातील दर्याचीवाडी (थेट सरपंच) आणि परहर बु. (२ सदस्य) या ग्रामपंचायतींमध्ये मागील निवडणुकीवेळी विशिष्ट प्रवर्गाच्या आरक्षणावर कुणीही उमेदवार उभा न राहिल्याने (नामनिर्देशन फॉर्म न भरल्याने) ही पदे रिक्त राहिली होती. आता पुन्हा या जागांसाठी निवडणूक लागली आहे; परंतु संबंधित आरक्षित प्रवर्गातून आता तरी कोणी उमेदवार उभा राहणार की ही पदे पुन्हा एकदा रिक्तच राहणार? हे पाहणे अत्यंत औत्सुक्याचे आणि महत्त्वाचे ठरणार आहे.
फलटण तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतींमध्ये होणार निवडणूक:
-
दर्याचीवाडी: १ थेट सरपंच (नामाप्र) – फॉर्म न भरल्याने रिक्त.
-
मिरेवाडी (कु.): १ थेट सरपंच (अनु. जाती) – राजीनाम्यामुळे रिक्त.
-
विडणी: ९ सदस्य (विविध प्रवर्ग) – अपात्रतेमुळे रिक्त (१ मृत्यू).
-
परहर बु.: २ सदस्य (नामाप्र व नामाप्र स्त्री) – फॉर्म न भरल्याने रिक्त.
-
वेळोशी: १ सदस्य (अनु. जाती) – निधनामुळे रिक्त.
-
बरड: १ सदस्य (सर्वसाधारण स्त्री) – निधनामुळे रिक्त.
-
ताथवडा: १ सदस्य (नामाप्र) – निधनामुळे रिक्त.
-
वडले: १ सदस्य (सर्वसाधारण) – अतिक्रमणामुळे अपात्र.
एकूण १७ जागांसाठी (१५ सदस्य आणि २ थेट सरपंच) ही निवडणूक होत असून, लवकरच प्रशासनाकडून या प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली जाणार आहे. यामुळे आगामी काळात तालुक्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
