
मुंबई : राज्य विधिमंडळाचे २०२६ सालचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणार असून ते २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात दिनांक ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प (Budget) मांडण्यात येणार आहे. विधानभवन येथे आज पार पडलेल्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली
या बैठकीत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात त्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे, असे या बैठकीत ठरवण्यात आले.
अधिवेशनाचे वेळापत्रक आणि सुट्ट्या
अधिवेशन काळातील कामकाजाचे नियोजन खालीलप्रमाणे ठरवण्यात आले आहे:
-
कामकाजाचा कालावधी: २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६.
-
अर्थसंकल्प सादरीकरण: ६ मार्च २०२६.
-
कामाचा शनिवार: शनिवार, दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी शासकीय सुट्टी असूनही विधिमंडळाचे कामकाज सुरू राहणार आहे.
-
सुट्ट्या: सोमवार दि. २ मार्च (होळी), ३ मार्च (धूलिवंदन) आणि १९ मार्च (गुढीपाडवा) या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच दिनांक २० मार्च रोजीही कामकाज बंद राहील. याव्यतिरिक्त १, ७, ८, १४, १५, २१ आणि २२ मार्च रोजी साप्ताहिक सुट्टी असल्याने कामकाज होणार नाही.
उपस्थित मान्यवर
या बैठकीला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह गटनेते आणि विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

