स्थैर्य, पुणे, दि. १२: उत्तमराव यांचे दि 7 एप्रिल, बुधवारी अकाली निधन झाले ! ते 55 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, कन्या, दोन पुत्र, सुना आणि नातवंडे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अर्थशास्त्र प्राध्यापक आणि सामाजिक विचारवंत डॉ विलास आढाव हे उत्तमरावांचे कनिष्ठ बंधू होते तर विगत 50 वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले चंद्रकांत आढाव हे ज्येष्ठ बंधू होते. सामाजिक कार्यकर्ते रमेश आढाव दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ बंधू होते !
उत्तमराव हे मूळचे गुणवरेगाव, तालुका फलटण , जि.सातारा येथील रहिवासी होते. सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते आयु. बी पी आढाव यांचे हे चार पुत्र होत ! बी पी आढाव हे बाबासाहेब आंबेडकरांचे निस्सीम आणि निष्ठावान अनुयायी होते. पुण्यातील एस एम जोशी हे त्यांचे मित्र होते. बी पी आढाव हे उत्तम वक्ते आणि संघटकही होते. त्यांनी फलटण शहरातील जातीभेदाच्या संदर्भात यशवंतराव चव्हाण यांना जाब विचारला होता! 1955 च्या दरम्यान बी पी आढाव बाबासाहेबाना भेटण्यासाठी मुंबईला गेले! दलित लोकांनी आपल्या पायाला स्पर्श करणे, ही गोष्ट बाबासाहेबाना मुळीच आवडत नसे! कोणी पाया पडण्याचा प्रयत्न केला तर बाबासाहेब हातातील काठीने त्या अंधभक्ताला मारत असत. बाबासाहेबांच्या चरणाला स्पर्श केल्याशिवाय मी फलटणला परत जाणार नाही ! असा बी पी आढावानी हट्टच धरला ! सरतेशेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच बी पी आढाव यांना दर्शन दिले आणि बी पी चा हट्ट पूर्ण केला ! सांगण्याचे तात्पर्य हे की आढाव बंधूंना ही प्रेरणा त्यांच्या बालवयातच लाभली होती. सारांश आंबेडकर विचारांचे बाळकडू बालवयातच चार आढाव बंधूंना मिळाले होते ! म्हणूनच त्यांची आंबेडकर निष्ठा बावनकशी आहे!
चंद्रकांत असो, रमेश असो, विलास असो अथवा उत्तमराव असो, हे सारे आंबेडकर विचार दीपस्तंभ समजून जगत आले, शिकत आले आणि कार्य करीत राहिले! बी पी आढाव हे चार बंधूचे उर्जाकेंद्र होते !
उत्तमराव हे आरंभी सामाजिक कार्यकर्ते होते आणि नंतर राजकीय नेते होते. त्यांनी रामनगर, रामटेकडी, हडपसर, महंमदवाडी, लष्कर, विवेकानंद नगर येथे खूप सामाजिक कार्य केले ! त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वाचनकक्ष सुरू केला, गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप केले! कामगार, मजूर यांच्यासाठी व्यवसाय सुरू केला ! स्वामी विवेकानंदनगर मध्ये जे मिलिंद बुद्ध विहार निर्माण झाले आहे, ते केवळ उत्तमरावांच्या सततच्या प्रयत्नांमुळेच निर्माण झाले आहे!
सामाजिक आणि राजकीय कार्यांपेक्षा उत्तमरावना धार्मिक कार्याची अधिक आवड होती! बुद्धवंदना आणि ध्यान धारणा करण्यात त्यांचे भान हरपून जात असे! बोलेन तेच करीन आणि करीन तेच बोलेन, हा उत्तमरावांचा स्थायीभाव होता! ते मनमिळावू, उत्साही आणि हरहुन्नरी होते !
उत्तमराव कॅम्प, हडपसर विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते! ते राजकारणातही चांगले स्थिर झाले होते! समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक उद्धारासाठी राजकारण करावे, असे त्यांचे धोरण होते! या कालावधीत उत्तमरावना हडपसर रामटेकडी आदी परिसरात प्रचंड लोकप्रियता प्राप्त झाली होती, ती केवळ त्यांच्या निस्वार्थ आणि निर्मम सेवेमुळेच !
याक्षणी माझ्यापुढे उत्तमरावच्या अनेक आठवणी फेर धरतात ! काय काय बोलावे, किती किती सांगावे, हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो! मी आढाव परिवाराचे कितीही सांत्वन केले तरी त्यांच्या परिवारातून, जीवनातून जे वजा झाले, ते पुन्हा मिळू शकत नाही ! तरीही वेडे मन
आठवणींचा धांडोळा उघडते !
संपला सोहळा, संपली कहाणी
तुझ्या स्मृतीने , डोळ्यात पाणीआले,
हे उत्तमराव, तुमच्या वेड्या मित्राची ही वेडीवाकडी भाव कुसुमांजली तुम्ही गोड मानून घ्या ! तुमचे मोठे हृदय मला कधी उमगले नाही !अगोदरच समाजात प्रामाणीक कार्यकरत्यांची उणीव त्यांत “उत्तम” कार्यकर्ता उत्तमरावांचे अचाणक जाणे केवळ कुटूंबाचिच नव्हेतर समाजाचिही न भरून निघणारी हानी आहे. आम्ही सर्वजण आपल्या दू:खात सहभागी असून सादर आदरांजली.जयभीम नमो बुद्धाय!
भिवा कांबळे, पुणे.