दैनिक स्थैर्य | दि. १९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत नीरा उजवा कॅनॉलवरील गावपुलाच्या शेजारी लिफ्ट क्र. २ येथे एक अनोळखी पुरूष जातीचा २५ ते ३० वर्षे वयाचा मृतदेह आढळून आला आहे. या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे हातपाय एका जाडसर रस्सीने बांधून त्यास कालव्याच्या पाण्यामध्ये टाकून दिले असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या मृतदेहाच्या व्यक्तीची उंची १६५ सें.मी., रंग सावळा, केस काळे, अंगाने सडपातळ तसेच मयताच्या अंगात फुल बाह्याचा निळ्या रंगाचा व त्यावर गडद आणि फिक्कट आडव्या पट्ट्या असलेला शर्ट, काळ्या रंगाची फुल पॅन्ट, जांभळ्या रंगाची अमोल माचो कंपनीची ८५ नंबरची अंडरवेअर व पांढर्या रंगाचे हाफ बनियान आहे.
या अनोळखी मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास पो.नि. सुनील महाडिक (९८२३५६२२५५), सपोनि अशोक हुलगे (८६५२४३३३९७), पो.उपनिरीक्षक सागर अरगडे (७०३८२५०७०७) व फलटण ग्रामीण पोलीस ठाणे (०२१६६-२२२५३३) येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.