विधेयकामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल : रावसाहेब दानवे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा दि.५: संसदेने मंजुर केलेली कृषि विधेयके हे 2022 पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार आहे. मात्र, काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष शेतकर्‍यांची दिशाभुल करत आहेत, अशी टिका विधेयकाला विरोध करणार्‍यांवर ग्राहक संरक्षण अन्न व नागरी पुरवठा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

सातार्‍यात येथील लेक व्हयू हॉटेलमध्ये आयोजित संवाद मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. दानवे पुढे म्हणाले, संसदेच्या सभागृहात शेतीविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. यानंतर या विधेयकाला वेगवेगळ्या पक्ष-संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. सरकार शेतीमाल हमीभावाने खरेदी करणार नाही हा काँग्रेस व मित्र पक्षांचा केवळ कांगावा आहे. कृषी विधेयकामुळे बाजार समिती मोडकळीस येतील ही अनाठायी भीती काँग्रेस व्यक्त करत आहे. शेतकर्‍यांना या विधेयकामुळे बाजार समिती बाहेर माल विक्री करण्याचा अधिकार मिळाला आहे. या विधेयकामुळे येत्या दोन वर्षात शेतीला उर्जितावस्था येऊन शेतकर्‍यांचे उत्पन्न दामदुप्पट होणार असल्याची ग्वाही दानवे यांनी दिली. उलट मोदी सरकारने शेतीच्या पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटींची तरतूद केली असून स्वामीनाथन समितीच्या नव्वद टक्के शिफारशी लागू केल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून संसदेमध्ये कृषिविषयक विधेयके मंजूर करण्यात आली. लोकांसमोर जाण्यासाठी काही मुद्दा नसल्याने काँग्रेस आणि मित्रपक्षांनी या विधेयकाला विरोध करायला सुरूवात केली असल्याची त्यांनी टिका केली. या माध्यमातून शेतकर्‍यांमध्ये अपप्रचार करण्यात येत आहे. मात्र, या विधेयकाला विरोध करणारे शेतकर्‍यांमध्ये गैरसमज पसरवण्यात यशस्वी होणार नाहीत, असा दावा करत शेतकर्‍यांनी चिंता करू नये. सरकार त्यांचा शेतमाल हमीभावानेच खरेदी करेल अशी ग्वाही दानवे यांनी दिली.

यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरजीत सिंह ठाकूर, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, भरत पाटील, अतुल भोसले, शहराध्यक्ष विकास गोसावी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार यावेळी उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!