
दैनिक स्थैर्य । दि. २४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । कास पठार परिसरातील अतीक्रमणांचा प्रश्न आता राष्ट्रीय हरित लवादात जाण्याची तयारी सुरू आहे . साताऱ्याचे सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे व व्यावसायिक सुजीत आंबेकर यांनी सुरु केली आहे. लवादात जाण्यापुर्वी श्री. मोरे यांच्यावतीने मुंबई येथील ॲड. असीम सरोदे यांनी अतीक्रमणे पाडण्याची कारवाई करण्याची मागणी करणारी नोटीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना पाठवली आहे. पंधरा दिवसांत अतीक्रमणे न पाडल्यास त्याविरोधात लवादात दाद मागणार असल्याचे नोटीसीत नमुद करण्यात आले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना श्री. मोरे म्हणाले, कास येथील अतीक्रमणांबाबतची कागदपत्रे जमविल्यानंतर ती हटविण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. याबाबत विनत्या, आंदोलने केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याठिकाणची पाहणी करत अतीक्रमणे हटविण्याच्या नोटीसा संबंधितांना दिल्या. या नोटीसा बजावल्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडीनंतर जिल्हा प्रशासन काही प्रमाणात पिछाडीवर आले. यामुळे त्याविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याबाबत दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार येथील अतीक्रमणांची कागदपत्रे आम्ही ॲड. सरोदे यांना दिली होती. त्यांनी अभ्यास करत विविध मुद्यांच्या आधारे येथील अतीक्रमण पाडण्याबाबतची विनंतीवजा नोटीस जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना नुकतीच पाठवली आहे.
यात कोणत्याही विभागाची परवानगी न घेता अतीक्रमण करत वनसंपदेसह वन्यप्राण्यांच्या असित्वास धोक्यात आणल्याचे तसेच इतर अनेक बाबी नमुद केल्या आहेत.नोटीशीस पंधरा दिवसात उत्तर देण्याची मागणी केल्याची माहिती श्री. मोरे यांनी यावेळी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करण्याची मागणीही श्री. मोरे आणि पत्रकार सुजीत आंबेकर यांनी यावेळी केली.