प्रवचने – ईश्वरप्राप्तीचा मार्ग – खरी तळमळ आणि संपूर्ण शरणागती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नुसता विषयाचा त्याग केल्याने ईश्वराची प्राप्ती होत नाही; बायकोचा त्याग करून होत नाही; जनात राहून होत नाही तसेच वनात राहिल्यानेही होत नाही. खरे म्हटले म्हणजे अमुक असे काही नाही, की जे केल्याने त्याची प्राप्ती होईल. तसे असते तर साधू ओळखायला काहीच वेळ लागला नसता. संत हे यांपैकी काय करीत नाहीत ? काही प्रपंच करतात तर काही वनात राहतात. म्हणून काय, की अमुकच केले म्हणजे ईश्वराची प्राप्ती होते असे नाही. मग असे काय आहे की जे केल्याने त्याची प्राप्ती होते ? तर त्यासाठी एकच लागते, ते म्हणजे, ईश्वराची प्राप्ती व्हावी ही मनापासून तळमळ लागली पाहिजे. ज्याला अशी तळमळ लागली त्याचे निम्मे काम झाले. ज्याप्रमाणे मोठी इमारत बांधण्यासाठी तिचा पाया अगोदर बळकट असावा लागतो, त्याप्रमाणे खरी तळमळ लागली म्हणजे पुढले कार्य व्हायला फार अडचण पडत नाही; आणि हे व्हायला भाग्य लागते. तळमळ लागल्यावर सर्व भोगांचा त्याग करावाच लागतो असे नाही. आपण रामाचे आहोत असे आपल्याला मनापासून वाटले पाहिजे; आणि त्याला शरण जाऊन आपण त्याचे आहोत असे वागले पाहिजे; म्हणजे त्याचे झाले पाहिजे. असे करण्याने आपला प्रपंच बिघडेल असे वाटते का ? आपण नोकरी करतो त्यावेळेस अंमलदाराबद्दल आपले चांगले मत असते का ? तो आपल्याला मनाने आवडत नसूनही आपण देहाने त्याचे काम करतोच की नाही ? तसे, आपण मनाने रामाचे आहोत असे ठरवून देहाने प्रपंच करावा, म्हणजे प्रपंच न बिघडता उलट चांगला होतो; कारण आपण ज्याला शरण गेलो त्याला त्याची लाज असते. बिभीषण रामाला शरण आला, तेव्हा त्याला मारून टाकावा असेच बाकीच्यांनी सांगितले. तरी पण रामाने सांगितले की, “जो मला शरण आला त्याचे रक्षण करणे माझे काम आहे.” शरणागताला नुसते जीवदान देऊन तो राहिला नाही, तर त्याला लंकेचे राज्य दिले. म्हणून सांगतो की, जो त्याचा होऊन राहतो, त्याची लाज रामाला असते.

माझ्याकडे इतके जण येतात, पण एकाने तरी ‘रामाची प्राप्ती करून द्या’ म्हणून विचारले का ? मी आलो आहे तो काय तुमचे विषय पुरविण्यासाठी ? समजा, एकजण चोरी करायला निघाला आणि वाटेत त्याला मारुतीचे देऊळ लागले. तिथे जाऊन मारुतीला नवस केला की, “मला जर आज चोरीत यश आले तर मी तुझ्या देवळावर सोन्याचा कळस चढवीन'” तर आता सांगा, त्याला मारुतीने काय द्यावे ? त्याने त्याच्या नवसाला पावावे असे तुम्हाला वाटते का ? जर नाही, तर तुम्ही विषय मागितले आणि मी दिले नाहीत तर मला दोष का देता ? आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की, “मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद म्हणजे समाधान रहावे, आणि दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ नये.”

साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे, आणि मग
‘भगवंत किंवा गुरू पाहून घेतील’ असे म्हणून आनंदात राहावे.


Back to top button
Don`t copy text!