दैनिक स्थैर्य। दि. २६ नोव्हेंबर २०२२ । फलटण । तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामुळे ऐन थंडीत गावागावात वातावरण चांगलेच तापणार आहे. शिवाय या निवडणुकीत सरपंच निवडही थेट मतदारांमधून होणार आहे. कोण जिंकणार, कोण हरणार याच्या गावपुढा-यांबरोबरच ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगु लागल्या आहेत.
दि. ९ नोव्हेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे.
तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी दि. १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३. छाननी दि. ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून छाननी संपेपर्यंत. अर्ज माघारी घेणे दि. ७ डिसेंबर दुपारी ३ पर्यंत. चिन्ह देणे व उमेदवारांची यादी जाहीर करणे दि.७ डिसेंबर दुपारी ३ नंतर. मतदानाची तारीख दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० पासून सायं ५.३० पर्यंत.निकाल दि. २३ डिसेंबर.
दि. ३० नोव्हेंबर रोजी शासनाने शिवप्रताप दिनानिमित्त सुट्टी असली तरीही संबंधित वेळेत अर्ज स्वीकारले जाणार आहेत असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. तसेच जात प्रमाणपत्र पडताळणी साठी तहसील कार्यालयातील निवडणूक मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
अर्ज भरण्यासाठी महा इ सेवा केंद्र व सेतू सुविधा केंद्र येथील ऑपरेटर यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवारांनी येथे जाऊन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणूक होणा-या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे मानेवाडी, ताथवडा, झडकबाईचीवाडी, वाठार निं., पिंट्या, आदर्की खुर्द, बरड, मठाचीवाडी, चौधरवाडी, तरडफ, वडले, दुधेबावी, कुरवली खु. विडणी, सोमंथळी, गिरवी, वेळोशी, आदर्की बु. , कुसूर, मिरेवाडी, सालपे, चव्हाणवाडी, सुरवडी.