
दैनिक स्थैर्य | दि. ८ डिसेंबर २०२३ | फलटण | अजित जगताप |
महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सध्या नागपूरला सुरू झालेले आहे. त्यामुळे आता नागपूरच्या संत्र्याची ही चर्चा होत असून सातार्यात नागपूरची संत्री विक्री करण्यासाठी जागोजागी फळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले आहे. जुन्या आरटीओ कार्यालयाच्या शेजारी सध्या गोड व रसबरीत संत्री विक्रीसाठी साक्षात ‘प्रभू’ अवतरले आहे. ‘प्रभू’ म्हणजे हे संत्री विक्रेत्या प्रभू आहेत.
याबाबत माहिती अशी की, संत्री हे हंगामातील फळांपैकी एक फळ आहे. तसेच संत्र्याला ‘सुपरफूड’ असेही म्हटले जाते. संत्री ही हिवाळ्यात खाल्ल्याने अनेक फायदे आहेत. त्वचा सुंदर आणि हिवाळ्यामध्ये होणार्या सर्दीपासून संरक्षण करण्यासाठी संत्री खाण्याने फायदेशीर होते. संत्र्यामध्ये सोडियम, व्हिटॅमिन ए आणि कॅल्शियम यांसारखी खनिजे आढळतात. तसेच संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीही मुबलक प्रमाणात आढळते. जर तुम्हीही संत्र्यांचा रोजच्या आहारामध्ये समावेश केलात तर तुम्हीची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच तुमचे वाढते वजन कमी करण्यासाठी मदत होते. संत्री खाल्ल्याने आपल्याला अपचनाचा त्रास होत नाही. आपण आपल्या सततच्या होणार्या केस गळतीमुळे त्रस्त असतो. त्यामुळे जर तुम्हाला केस खूप गळती किंवा केस पातळ होण्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारामध्ये संत्र्याचा समावेश करू शकता. ते तुमच्या फायद्याचे ठरू शकते. तसेच रोज संत्र्याचा रस प्यायल्याने त्याचाही तुम्हाला फायदाच होईल. तुम्हाला तुमच्या डोळ्यांशी संबंधीत समस्या असतील तर तुम्ही रोज संत्री खाण्याची किंवा संत्र्याचा रस पिण्याची सवय लावून घ्या. ज्याचा तुम्हाला अनेकदा फायदा जाणवेल.
संत्र्यामध्ये ‘क’ हे जीवनसत्त्व असते. जे हिरड्यांमधून रक्त येणे थांबते व दात हिरड्यांमध्ये मजबूत होण्यास मदत होते. संत्र्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे, घटक असल्याने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी संत्रे खाणे आवश्यक आहे.
अशी गुणकारी संत्री खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे. साधारणपणे शंभर रुपयाला सव्वाकिलो म्हणजेच आठ संत्री भेटतात. अत्यंत रसभरीत व कडक संत्री सुद्धा गोड लागत असून ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. सातारा बसस्थानक, पोवई नाका, जुने आरटीओ कार्यालय चौकात तसेच बॉम्बे रेस्टॉरंट, मोती चौक या ठिकाणीही नागपूरची संत्री त्यांचा सुगंध दरवळत आहेत.