दैनिक स्थैर्य । दि. 29 सप्टेंबर 2024 । फलटण । येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याची 69 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल शनिवार दि. 28 सप्टेंबर रोजी विधानसभेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपक चव्हाण, संचालक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्या अध्यक्षेतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न झाली.
यावेळी श्रीराम सहकारी साखर काररखान्यासह फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम सहकारी साखर कारखाना हा राज्यातील एकमेव असा साखर कारखाना आहे की जो अवसायानात काढण्याऐवजी सहकारी तत्वावर चालविण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी सुद्धा सदर “कारखाना अवसायानात काढुन स्वत: विकत घेवून चालवा” असा सल्ला त्यावेळी आम्हा मंंडळींना दिला होता परंतू फलटण तालुक्यातील शेतकर्यांच्या हितासाठी व आमच्या पूर्वजांनी सुरु केलेला कारखाना आम्ही अवसायानात जावू न देण्यासाठी सहकारी तत्वावर कारखाना सुरु ठेवला व आज हा कारखाना कर्जमुक्त झाला असून आगामी काही वर्षात कारखाना स्वबळावर संपूर्ण ताकतीने उभा राहील असा विश्वास विधापरिषदेचे सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत राजमराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, श्रीराम सहकारी साखर कारखान्यासोबत राज्यामध्ये इतर सहकारी संस्थांची उभारणी करण्यामध्ये श्रीमंत मालोजीराजे साहेबांचे योगदान कोणीही विसरु शकत नाही त्यावेळच्या त्यांच्या निर्णयामुळेच आज सहकारी संस्था जीवंत आहेत. एका तरुण सभासदाने सांगितलेल्या माहितीनुसार फलटणसह माळेगाव, कराड येथील कृष्णा यासह विविध सहकारी संस्थांची उभारणी करण्यासाठी श्रीमंत मालोजीराजे साहेबांनी कायमचे प्रोत्साहन दिले व त्यांच्याच आदर्शावर आजसुध्दा श्रीराम साखर कारखाना सुरु आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी कारखान्याची गतकाही वर्षामधील केलेल्या योजना व विविध उपक्रमांची माहिती दिली. तर अहवालाचे वाचन कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत तळेकर यांनी केले.