दैनिक स्थैर्य | दि. १७ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण येथे अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या श्रीमती वैदेही दुबळे प्रदीर्घ काळापासून गिरवी येथील गोपाळकृष्णाची भक्ती करतात. त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षी संपूर्ण गीता कंठस्थ केली आणि श्रृंगेरी मठात जाऊन परीक्षा दिली. परीक्षेत उत्तमपणे यशस्वी झाल्याने श्रीमती वैदेही यांना पुरस्कार व त्याबरोबर प्रसादरूपी रक्कम मिळाली. ही सर्व गिरवीच्या गोपाळकृष्णाची कृपा आहे, असे समजून त्यांनी सर्व मिळालेली बक्षिसाची रक्कम एकादशीदिवशी (१० सप्टेंबर) गिरवी मंदिरात कृष्णचरणी समर्पित केली.
यावेळी गिरवीतील गोपाळकृष्ण मंदिरातर्फे त्यांचे अभिनंदन करून विद्यमान उत्तराधिकारी श्री. जयंतकाका व सौ. सुनीता देशपांडे यांनी श्रीफळ व सत्कार करून त्यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमती वैदेही यांनी गीता उपदेशाचे आचरण (सर्व कृष्णार्पण) करून आदर्श ठेवला आहे, असे श्री. जयंतकाका यांनी यावेळी गौरवोद्गार काढले.
याप्रसंगी पुणे, सोलापूर, सातारा, फलटण, गिरवी येथील साधक उपस्थित होते. त्यातील काही व्यक्तींनी गिरवी गोपाळकृष्ण कृपेचे विलक्षण अनुभव यावेळी कथन केले.