स्थैर्य, बारामती, दि.१२: बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला तरच निर्बंध आणखी शिथील केले जातील, प्रशासनाने पुढील दोन दिवसांनी परस्थिती पाहून निर्णय घ्यावा. यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जावा. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, रूई ग्रामीण रूग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना विषाणूसह, म्युकरमायकोसीसच्या प्रादुर्भावाची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण, ऑक्सिजन उपलब्धता, आरोग्य सुविधा आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत राहिला तरच निर्बंध आणखी शिथील केले जातील. प्रसाशनाने पुढील दोन दिवसांनी परस्थिती पाहून निर्णय घ्यावा, यासाठी राज्य सरकारने ठरवून दिलेल्या निकषाचाही विचार केला जावा. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधक लस जास्तीत जास्त उपलब्ध करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यात यावे. म्युकरमायकोसिसची लक्षणे, काळजी, उपचार यांची माहिती ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवावी. त्याबाबत जनजागृती करावी. तसेच म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी वापरण्यात येणा-या इंजेक्शनचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कान, नाक, घसा तसेच इतर लक्षणे जाणवताच तातडीने रुग्णालयात जावून नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. शासन व प्रशासनाच्या प्रयत्नांनी व नागरिकांच्या सहकार्याने बाधितांची संख्या घटली असली तरीही संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिसच्या औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मोबाईल क्लिनिक व्हॅनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते उद्घाटन
मा.हिराभाई बुटाला विचारमंच यांच्याकडून फिरता दवाखाना (मोबाईल क्लिनिक व्हॅन) चे उद्घाटन मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुटाला विचारमंचाचे कौस्तुभ बुटाला आणि प्रतिभा हांडेकर हे उपस्थित होते. या फिरत्या दवाखान्यामार्फत बारामती शहरातील नागरिकांची मोफत तपासणी करून औषधेही मोफत देण्यात येणार आहेत. तसेच दाना इंडिया टेक्निकल सेंटर प्रा.लि. हिंजवडी, पुणे यांच्या CSR फंडातून व मिलिंद वालवाडकर यांच्या प्रयत्नातून बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयास मिनी व्हेंटिलेटर (पोर्टेबल बायपास) देण्यात आले. त्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. दीपेश राव, अमेरिका यांच्याकडून म्युकर मायकोसिस साठी लागणाऱ्या इंजेक्शन चे 25 डोस रुई ग्रामीण रुग्णालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.