भाटिया हॉस्पिटलमधील 82 नर्सना कोरोनाच्या भीतीने घरमालकांनी घर सोडायला सांगितले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 29 : शहरातील शेकडो कोरोना बाधितांच्या शुश्रुषेसाठी अहोरात्र काम करणार्या भाटिया हॉस्पिटलमधील 82 नर्सना त्यांच्या घरमालकांनी घर सोडण्यास सांगितले आहे. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे.

या मागचे धक्कादायक कारण असे की, ज्या ग्रँट रोड भागात या नर्स भाड्याने इमारतींमध्ये राहतात, त्या इमारतीलगतच्या अनेक इमारतींतील रहिवाशांनी या नर्सकडून कोरोनाचा फैलाव होईल अशी भीती व्यक्त केली. या भीतीला बळी पडून घरमालकांनी या 82 नर्सना घर सोडण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर या घरमालकांनी, सोसायटीनी या नर्सना त्यांचे सामानही घेऊन जाण्यास परवानगी दिलेली नाही. आपण हॉस्पिटलमध्ये कामासाठी जात असाल तर इमारतीत प्रवेशही दिला जाणार नाही, अशीही अट नर्सना घालण्यात आली होती.

अचानकपणे या 82 नर्सपुढे राहण्याचा पेच आल्याने भाटिया हॉस्पिटलने काही नर्सना हॉस्पिटलमध्ये तर काहींना जवळच्या हॉटेलमध्ये व आसपासच्या बिल्डिंगमध्ये राहण्याची सोय केली आहे.

केरळमधून मुंबईत आलेल्या 23 वर्षीय रीनू एलिझाबेथ कोशी गेली तीन महिने भाटिया हॉस्पिटलमध्ये काम करत आहे. पहिल्या महिन्यानंतर त्यांना शेजारच्या कुटुंबांनी घर सोडून जाण्यास सांगितले. त्या जेव्हा कामावरून येत होत्या तर बिल्डिंगचे गेट बंद केले जात होते. अनेक मिनतवार्या करून सोसायटी प्रवेश देत असे. एके दिवशी त्यांच्याकडून ओळख पत्र मागवले व ते बनावट असल्याचे सांगत रीनू यांना घर खाली करण्यास सांगितले.

अशाच प्रकारचा अनुभव ऐश्वर्या यांना आला. त्यांना 20 व्या दिवशीच इमारतीत प्रवेश देण्यास नकार दिला गेला. त्यांनी आपण सर्व प्रकारची स्वच्छता, काळजी घेत असल्याचे सोसायटीला सांगितले पण सोसायटीने ऐश्वर्या यांच्या घरातला कचराही महापालिकेने उचलू नये असे सांगण्यास सुरवात केली. नंतर त्यांना लिफ्टमधून जाण्यास बंदी केली. आता त्यांनी घर सोडले असले तरी त्यांना त्यांचे सामान दिले जात नाही. आपल्या समाजात आरोग्यसेविकांबाबत आदर नसल्याची खंत ऐश्वर्या यांनी बोलून दाखवली.

भाटिया हॉस्पिटलमधील काम करणार्या स्वीटी मँडट यांच्या मते, आम्ही सर्वजण आमचे घर सोडून समाजाची सेवा करण्यासाठी एवढ्या लांब आलेले असतो. आमचे जगणेही आम्ही धोक्यात घालत असतो. हॉस्पिटल प्रशासनाने अनेक इमारतींना पत्र पाठवून नर्सना त्यांचे सामान देण्याविषयी विनंती केली होती पण त्या पत्राला उत्तरे न देता, ज्या नर्स सामान घ्यायला येतील त्यांचा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल मगच सामान दिले जाईल, अशी भूमिका सोसायटींनी घेतल्याचे स्वीटी मँडट यांनी सांगितले.

सध्या काही नर्सना हॉटेलमध्ये ठेवले आहे. 10 रुम एका महिन्यासाठी घेतल्या आहेत पण या रूमचे दिवसाचे भाडे 33 हजार रू. इतके आहे.

या संदर्भात अतिरिक्त शहर आयुक्त सुरेश ककनी म्हणाले, अनेक खासगी रुग्णालयात स्टाफची राहण्याची सोय या वरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. स्टाफला लांबचा प्रवास करता येऊ नये यासाठी काळजी घेतली जाते, त्यात सोसायटींचा त्रासही त्यांना होत असतो. अशावेळी जवळ राहण्याची सोय कुठे होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भाटिया हॉस्पिटलचे संचालक डॉ. आरबी दस्तूर यांनी सांगितले की किमान आठ नर्सनी काम सोडले आहे. या नर्सना समाजाकडून भेदभाव वागणूक मिळाली आहे. अशा विपरीत परिस्थितीत डॉक्टर, नर्स व रुग्णालयाला काम करावे लागते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!