दैनिक स्थैर्य | दि. २१ ऑगस्ट २०२४ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) येथे १९७४ साली सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू केला. त्यानंतर प्रत्येकवर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह आजपर्यंत अविरतपणे सुरू असून या सप्ताहास यावेळी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. हा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आजपासून निंभोरे येथे सुरू होत आहे.
हा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ निंभोरे यांनी केले आहे. यामध्ये आज श्री विठ्ठलाची तसेच श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची, श्री संत तुकाराम महाराजांच्या तसेच आदी संतांच्या प्रतिमेचे पूजन करून सप्ताहाला सुरुवात होऊन विना उचलला जातो. आणि सात दिवस सर्व ग्रामस्थ दिवसरात्र नंबरप्रमाणे विन्याची सेवा अखंडपणे बजावतात. तसेच रोज पहाटे ५ वाजता विधीवत पूजा होऊन काकडा आरती, सकाळी ८ वाजता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन, ९ वाजता नाश्ता, दुपारी १२ वाजता हरीपंगत, दुपारी २ वाजता विविध गावच्या महिला भजनी मंडळांची भजन सेवा, सायंकाळी ५ वाजता प्रवचन, सायंकाळी ६ वाजता हरिपाठ, सायंकाळी ७ वाजता हरीपंगत, सायंकाळी ९ वाजता हरीकीर्तन सेवा, रात्री ११ वाजता भजनी मंडळाचा हरिजागर असा दैनंदिन कार्यक्रम सात दिवस उत्साहात सुरू असतो.
या कार्यक्रमांमध्ये समाज प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच सोमवार, दि. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता दिंडी गाव प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. सायंकाळी ७ वाजता दीपप्रज्ज्वलनाचे आयोजन केले आहे. तसेच रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मसोहळा साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. २७ ऑगस्ट रोजी सकाकाळी १० वाजता गोपाळ काल्याचे किर्तन आयोजित केले आहे आणि त्यानंतर महाप्रसाद व त्यानंतर सप्ताहाची सांगता होणार आहे.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे व्यासपीठ सेवा ह.भ.प. सौ. मीराताई निलेश रणवरे (अध्यक्षा, व्यसनमुक्ती महिला आघाडी संघ, महाराष्ट्र राज्य) यांच्याकडून संपन्न होणार आहे.
सप्ताहात निंभोरे पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळ तसेच वाचक, सेवक, विणेकरी, टाळकरी व ग्रामस्थ यांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे.