स्थैर्य, सातारा दि. २१ : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदी धोरणाच्या निषेधार्थ सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारा बाहेर आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली थाळीनाद आंदोलन करण्यात आले.
आंदोलनानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, देशात 27 कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. रेल्वे, विमानतळ याचाही त्याच्यामध्ये समावेश केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताना ’ना खाऊंगा ना खाने दूंगा’ अशी घोषणा केली होती. आज मात्र त्याच्या उलट चित्र दिसून येत आहे. शुक्रवारी संसदेमध्ये एक कायदा पास करण्याचा प्रयत्न झाला. या कायद्यानुसार शेतकर्यांना देशात कुठेही व्यवसाय करता येणार आहे. आपला भाजीपाला विकता येणार आहे. मात्र हा कायदा करून मोठ्या कंपन्यांना पायघड्या घालण्याचा डाव केंद्र सरकारचा असून बाजारपेठ काबीज करण्याचे त्यांचे षडयंत्र असल्याचा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला. ते म्हणाले, कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा बाळगून देशभरातील अनेक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली. सातारा जिल्ह्यात लोणंद, खंडाळा, माण, खटाव या तालुक्यांसह अन्य तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक घेण्यात आले. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी धोरण अवलंबले असल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये प्रचंड चिंतेचे, असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने यापूर्वी कांदा निर्यातबंदी हटवली होती. मात्र कालच कांदा निर्यातबंदीची घोषणा केल्यामुळे मोदी सरकारचे आश्चर्य वाटत आहे. नरेंद्र मोदी सरकारला निवडणुका आल्या की शेतकरी आठवतात असे सांगून शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकर्यांचा आवाज मोदी सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी, कांदा निर्यात बंदीच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून सातारा येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असल्यामुळे शेतकर्यांच्या हितासाठी केंद्र सरकारच्या सहकारी पक्षाच्या एका मंत्र्याने दोन दिवसापूर्वीच राजीनामा दिला आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.