दैनिक स्थैर्य | दि. २४ जानेवारी २०२५ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे १७ जानेवारी २०२४ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
यावर्षीची स्नेहसंमेलनाची संकल्पना होती ‘संस्कार अपि संस्कृती’ ज्यामध्ये पंचमहाभूत, नवरस, आणि संस्कारांच्या महत्त्वावर विशेष भर देण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सौ. संध्या फाळके यांनी या संकल्पनेची आखणी केली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद हळबे यांचा परिचय व स्वागत करण्यात आले. शाळेचा वार्षिक अहवाल इयत्ता नववीतील रिदा आतार हिने सादर केला. यानंतर शाळेच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, आणि कलात्मक सादरीकरणे केली. यामध्ये प्रथम पंचमहाभूतांवर आधारित नृत्ये सादर झाली. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांची ओळख करून देणारी सादरीकरणे झाली. त्यानंतर नवरस आधारित सादरीकरणे झाली. यामध्ये शृंगार, रौद्र, हास्य, शांत, विभत्स, भयानक, वीर, अद्भुत, आणि करुण रसांचे नृत्य व नाटके सादर करण्यात आली.
या कार्यक्रमात काही विशेष सादरीकरणे झाली. त्यामध्ये तानाजी मालुसरे आणि संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा तसेच शंकर महादेवन यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर करण्यात आले.
पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन समारंभ संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व संस्कारमूल्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम यशस्वी झाला.
यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद हळबे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अशोक जोशी (उपाध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी), श्री. रमनलाल जोशी(व्हॉइस चेअरमन गव्हर्निंग कौन्सिल स्कूल कमिटी), मा. श्री. भोजराज नाईक निंबाळकर (मेंबर गव्हर्निंग कौन्सिल, मेंबर स्कूल कमिटी), श्री. चंद्रकांत पाटील (मेंबर गव्हर्निंग कौन्सिल, मेंबर स्कूल कमिटी), घोरपडे सर (गव्हर्निंग कौन्सिल मेंबर) श्री. अरविंद निकम (प्रशासकीय अधिकारी फलटण एज्युकेशन सोसायटी) तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांमधील शाखाप्रमुख सौ. नसरीन जिरायत, सौ वैशाली जाधव, सौ. अनिता राणी कुचेकर, श्री. नरुटे सर तसेच पत्रकार मा. श्री. मुकुटराव कदम तसेच जाधववाडी ग्रामपंचायत सदस्या सौ. सारिका चव्हाण आणि सौ.कल्पना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेच्या प्राचार्या सौ. संध्या फाळके यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. सतीश पवार व सौ. मनीषा जाधव आणि शाळेतील काही विद्यार्थ्यांनी केले, तर आभार निंबाळकर यांनी मानले.
कार्यक्रमाला पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.