स्थैर्य, नांदेड, दि.१०: पंजाब सरकारने बंदी घातलेल्या ‘खलिस्तान जिंदाबाद’ फोर्स (केझेडएफ) संघटनेचा दहशतवादी गुरपिंदरसिंग ऊर्फ बागीला (वय ३७, रा. गुरुसर, जि. मुक्तसरसाहिब, पंजाब) नांदेड आणि पंजाब पोलिसांच्या पथकाने रविवारी (दि. ७) नांदेड येथून अटक केली. यापूर्वी नांदेड आणि पंजाब पोलिसांची त्याच्यावर पाळत होती. दोन दिवस हे गोपनीय ऑपरेशन राबवण्यात आले. बागीला नांदेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला प्रवासी पोलिस कोठडी सुनावली. यानंतर मंगळवारी पोलिसांचे पथक त्याला घेऊन पंजाबकडे रवाना झाले.
आश्चर्य म्हणजे बागी लॉकडाऊनपासून नांदेडमध्ये वास्तव्यास होता. तो शहरातील विविध भागांतील लोकांच्या भेटी घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून यानंतर नांदेड पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. पंजाब पोलिसांनी ‘खलिस्तान जिंदाबाद’ फोर्सशी संबंधित चार जणांविरुद्ध बंदी आदेश जारी केले होते. त्यापैकी एक जण नांदेड येथे असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांना मिळाली होती.
त्याअनुषंगाने पंजाब पोलिस नांदेड येथे दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. शेवाळे यांच्यासमोर पंजाब पोलिस पथकाने कागदपत्रे सादर करूनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर आरोपीस पकडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती व पंजाब पोलिसांच्या टीमकडून नांदेडमध्ये दोन दिवस गोपनीय ऑपरेशन चालवण्यात आले. नांदेड तहसील कार्यालय परिसरातून आरोपीला रविवारी (दि.७) दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी अटक केली.
बेल्जियमवरून चालते संघटनेचे काम, मिळते मदत
सरबजितसिंग गुरदेव सिंह किरत (रा. गाव भामीपुरा कलां, जि. लुधियाना) {अमनदीपसिंग भिंदर (रांग्रेटानगर, फरीदकोट) {गुरदीपसिंग बागी (रा.कालीजपूर, जिल्हा गुरदासपूर) हे ‘खलिस्तान जिंदाबाद’ फोर्सचे सदस्य आहेत. पंजाबमध्ये दहशतवादी कारवायांचे कट रचण्यासाठी ते सक्रियपणे काम करत असल्याचे पंजाब पोलिसांचे म्हणणे आहे.
बेल्जियमस्थित दहशतवादी जगदीशसिंह भुरा (मोही गाव, पीएस सुधर जिल्हा लुधियाना ग्रामीण जागरांव) यांच्याशी संपर्कात आहेत. ही संघटना वेगवेगळ्या देशांकडून निधीची व्यवस्था करून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे मिळवून देत असल्याचे पंजाब पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डिसेंबरपासूनच पोलिस मागावर
१९ डिसेंबर २०२० ला पंजाबच्या तरणतारण भागात काही जण दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आल्यानंतर पंजाब येथील ‘स्टेट स्पेशल ऑपरेशन फोर्सने’ चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी यातील एक आरोपी सरबजितसिंगला अटक केली. त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सरबजितसिंग हा दुबईत गेल्यानंतर त्याची भेट खलिस्तानी दहशतवाद्यांशी व खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या सदस्यांशी झाली होती. बेल्जियममधील दहशतवादी जगदीशसिंग भुरा या साऱ्यांना आर्थिक मदत करत होता तर गुरदीप सिंगकडे नेमकी कुणाची हत्या करायची याचे टार्गेट निश्चित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, सरबजितसिंग याने दिलेली माहिती धक्कादायक असल्याचे पंजाब पोलिसांतील सूत्रांचे म्हणणे आहे. सरबजितच्या सांगण्यावरूनच गुरुपिंदरसिंग हा नांदेडमध्ये लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे बोलले जाते. आता या माहितीच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
१९ डिसेेंबरला सरबजितसिंगला केली होती अटक
अटक करण्यात आलेला गुरपिंदरसिंग हा लॉकडाऊनपासून नांदेडमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती उघड झाली आहे. या कालावधीत तो नेमका कुणा-कुणाच्या संपर्कात होता, तो नांदेडमध्ये कुठे जायचा याची माहिती मिळवण्याचे मोठे आव्हान आता नांदेड पोलिसांसमोर आहे.