श्रीनगरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार; बस दरीत कोसळली, १० ठार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ९ जून २०२४ | नवी दिल्ली |
जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये भाविकांना घेऊन जाणार्‍या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान रियासी जिल्ह्यातील कांडा भागात हा दहशतवादी हल्ला झाला.

रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा यांनी सांगितले की, प्राथमिक वृत्तानुसार, शिव खोडीहून कटरा येथे जाणार्‍या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये चालक जखमी झाला आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस खड्ड्यात पडली. १० जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले.

मोहिता शर्मा यांनी सांगितले की, बसमधील इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. प्रवाशांची ओळख पटलेली नाही. प्रवासी हे स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. शिव खोडी मंदिर हे माता वैष्णो देवीचे बेस कॅम्प आहे. सुरक्षा दलांनी तो सुरक्षित करून परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये ४ मे रोजी हवाई दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले असून त्यांना उधमपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. अन्य एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

हा हल्ला पुंछमधील शाहसीतार भागात झाला. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दोन गाड्यांवर जोरदार गोळीबार केला. यातील एक वाहन हवाई दलाचे होते. दोन्ही वाहने सनई टोपकडे जात होती. दहशतवाद्यांच्या गोळ्या वाहनाच्या पुढील आणि बाजूच्या काचा ओलांडून गेल्या.

या वर्षी १२ जानेवारीला जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. यानंतर जवानांना प्रत्युत्तर द्यावे लागले. यात कोणी जखमी किंवा ठार झाल्याचे वृत्त नाही.

१६ डिसेंबर २०२३ रोजी बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने गुप्तचरांचा हवाला देत माहिती दिली होती की २५० ते ३०० दहशतवादी पाकिस्तान सीमेवर लॉन्चपॅडवर आहेत. ते जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अधिकार्‍याने सांगितले की, सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले आहे. सीमेपलीकडून घुसखोरीचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल.

बीएसएफचे आयजी अशोक यादव यांनी पुलवामा येथे सांगितले की, दहशतवादी कारवाया पाहता आम्ही (बीएसएफ) आणि लष्कर संवेदनशील भागांवर लक्ष ठेवून आहोत आणि सतर्क आहोत. गेल्या काही वर्षांत सुरक्षा दल आणि काश्मीरमधील जनता यांच्यातील बंध वाढले आहेत. जनतेने आम्हाला सहकार्य केल्यास आम्ही विकासकामे अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊ शकतो.


Back to top button
Don`t copy text!