
दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। सातारा। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणार्या एक हजार प्रगतशील शेतकर्यांची निवड करून त्यांना दहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या माध्यमातून शेतकर्यांचे उत्पादन वाढावे, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीन पाटील व उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, बँकेस 2024-25 या आर्थिक वर्षात विक्रमी करपूर्व 233.47 कोटींचा नफा झाला असून, त्यापोटी 35.60 कोटी आयकर भरला असल्याने 197 कोटी 88 लाखांचा करोत्तर नफा झाला आहे. सलग 18 वर्षे शून्य टक्के नेट एनपीए राखण्यात यश मिळविण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा बँकेला झालेल्या नफ्यातून केलेल्या तरतुदीची माहिती देण्यासाठी बँकेच्या मुख्य कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ संचालक, आमदार रामराजे नाईक निंबाळकर,सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, राजेंद्र राजपुरे, प्रभाकर घार्गे, दत्तानांना ढमाळ, शिवरूपराजे खर्डेकर, ज्ञानदेव रांजणे, प्रदीप विधाते, सुनील खत्री, कांचन साळुंखे, ऋतुजा पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे उपस्थित होते.
खासदार नितीन पाटील, अनिल देसाई, डॉ. सरकाळे म्हणाले, जिल्हा बँकेच्या 11 हजार 468 कोटींच्या ठेवी असून, 7593 कोटी 74 लाखांची कर्जे आहेत. बँकेचा संमिश्र व्यवसाय 19 हजार 61 कोटी 98 लाख झाला आहे. बँकेच्या स्वनिधीमध्ये 82.93 कोटींची भरीव वाढ होऊन तो 1060.28 कोटी झाला आहे. सुरक्षित गुंतवणूक 7508 कोटी 39 लाखांची केली आहे. बँकेस ढोबळ नफा 104 कोटी एक लाख रुपये असून, कर्जाच्या 1.37 टक्के आहे. बँकेने सलग 18 वर्षे शून्य टक्के नेट एनपीए राखला आहे. बँकेच्या सभासद संस्थांना 12 टक्के प्रमाणे लाभांश देण्यासाठी 38.57 कोटींची तरतूद केली आहे. बँकेने नफ्यातून सभासदांच्या पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज परताव्यासाठी 2.69 कोटींची तरतूद केली आहे.
जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचा निकाल कधीपर्यंत लागेल, या प्रश्नावर खासदार नितीन पाटील म्हणाले, आगामी काळात काही पदे रिक्त होणार आहेत. या रिक्त होणार्या पदांच्या भरतीसाठी वाढीव पदाच्या मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. हा प्रस्ताव सहकार आयुक्तांनी मान्यता देऊन त्याबाबतचे पत्र बँकेस पाठविले आहे. त्यावर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून मान्यता घेतली आहे. त्यामुळे लवकरच भरतीचा निकाल जाहीर केला जाईल.
जिल्हा बँक यावर्षीपासून ठिबकचा वापर करणार्या शेतकर्यांना पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी शासनाकडून अनुदान मिळत असल्याने ही योजना बंद केली होती; पण आता ही योजना पुन्हा सुरू केली जात असून, त्यासाठी नफ्यातून 60 लाखांची तरतूद केली आहे, असेही श्री. पाटील, श्री. देसाई यांनी सांगितले.त्यामुळे हे कर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन म्हणून 3.99 लाखांची तरतूद सोसायटी गोडाऊन बांधकाम व्याज प्रोत्साहनास 67.95 लाखांची तरतूद केली आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली शेतात उभारण्यासाठी साखर कारखान्यांच्यामाध्यमातून एक हजार प्रगतशील शेतकर्यांना दहा हजार रुपयांप्रमाणे अर्थ साहाय्य केले जाणार आहे. त्यासाठी अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि राज्य शासनासोबत सामंजस्य करार ऊस लागण उत्पादन वाढीसाठी केला आहे. 969 विकास सोसायट्यांपैकी 920 संस्था नफ्यात आणण्यात यश आले आहे.