मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे – आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । पुणे । मुंबई, पुणे आणि ठाणेसह दहा अति जोखमीच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत.

कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी उपाय योजनाबाबत आयोजित केलेल्या विशेष कार्य दलाच्या बैठकीत ते बोलत होते.

डॉ. सावंत यांनी पुनर्रचित टास्क फोर्सच्या सदस्यांची व्हीसीव्दारे बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. पुणे येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयातून डॉ. सावंत यांनी सदस्यांशी संवाद साधला. यावेळी संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, अतिरिक्त संचालक तथा टास्क फोर्सचे सदस्य सचिव डॉ. रघुनाथ भोये उपस्थित होते.

टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके, सदस्य लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. हर्षद ठाकूर, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक दूरदृष्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.

डॉ. सावंत यांनी कोविड १९ चाचण्यांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या मॉक ड्रीलमध्ये आढळलेल्या त्रुटींचे तत्काळ निराकरण करावे. मास्कच्या वापर करण्याबाबत जनतेला आवाहन करण्यात यावे. जत्रा, मॉल, थिएटर, बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी या मास्क आवर्जून वापरण्याबाबत आवाहन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.

यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी कोविड बाधितांना मेटाफॉर्मिन गोळीचा फायदा दिसून येतो. पण या गोळीचा प्रोटोकॉल मध्ये समावेश नाही, असे सांगितले. यावर या गोळीचा रुग्ण बरे होण्यासाठी मदत होत असल्यास त्याबाबतचे संशोधन फोर्सच्या सदस्यांना उपलब्ध करून द्यावे. जेणेकरून त्याबाबत पुढील कार्यवाही करता येईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.

कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण झाल्यावर रुग्णांना ऑक्सिजन ची विशेष गरज भासत नाही. पण संसर्ग पाहता कोविड ची लागण झालेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.

कोविडच्या चाचणी करण्यासाठी प्रयोगशाळा कार्यान्वित आहेत का याची खात्री करावी, नियमित पर्यवेक्षण करावे, प्रयोगशाळांची क्षमता वाढवावी, अशा सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. कोविडच्या सध्याच्या व्हेरियंटची लागण जास्त जोखमीची नाही. लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत. हा संसर्ग पंधरा मेपासून कमी होऊ लागेल, असे सर्व सदस्यांनी बैठकीत सांगितले.


Back to top button
Don`t copy text!