कालचं धुकं अन् परवाचा पाऊस याने शेतकरी हवालदिल झाला.मोठ्या मेहनतीने रब्बी हंगाम साधला होता.काळी आई हिरवा शालू नेसून डोलत होती.बळीराज येणा-या धनातून म्होरली सपान बघत असतानाच अवकाळी अन् धुकं याने त्याच जीणं धाकधुकीच करुन सोडलं.
द्राक्षांचे फुटलेले मणी,मोहराने बहरलेली आमराई मोहर गळून जाण्याची भीती,निसवलेल्या ज्वारीत अंतरा,पोट-यातील गव्हावर तांबेरा,घाट्यातला हरभार आंब धुऊन ,भाजीपाला सडला,पावटा,घेवडा,कोंथमिर,गाजरं,दोडका,भोपळा,वांगी,पावटा,वाटणा अवकाळीने व धुक्याने करपा,मावा,फुलकिड,भुरी,तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
ऊसतोड कामगारांच्या कोप्यात पाणी शिरुन होता नवता तेवढा पसाकुडता भिजला.लेकर बाळ गारठली. चूल पेटयाचा प्रश्न .बैल जाग्यावरच चिखलता धन्याची अवस्था बघून जाग्याच गप्पगार झाली.आपणाला जमलं तेवढं ह्या सोय-यांना मदत करावी.
घरदार सोडून डोंगरदा-यात मेंढराच्या मागे प्वाटासाठी जाणारे बांधव तर या अवकाळीने डोक्याला हात अन् डोळ्यांतून पाणी सुन्न नजर लावून बसली आहेत. पशूधन जाग्यावच गारठून दगावलेली बघून तो हतबल झाला. शासनाने वेळीच मदत करावी. आपणाला जसं जमलं तसं त्यांच्या तळावर जाऊन मदत व धीर द्यावा.
“निसर्गराजा एवढा कोपू नगस.अरे पावसाने झोडपले,राजाने लाथडले अन् नव-याने मारले तर तक्रार करायची कुणाकडं?”
“माणसा ,तुला जगायचं कसं हेच कळना म्हणून मला असे वागावे लागते.जरा इचार कर.जंगल तोड, प्रदुषण, वाहनांचा अतिरेक, प्लास्टिकचा भरमसाठ वापर, प्राण्यांचा आधिवास संपुष्टात , नद्यांच्या बेसुमार वाळू उपसा, समुद्रात सर्व निचरा, डोंगर फोड, सिमेंट जंगले, पाणी आडवा मुरवा यापेक्षा भावकीची जिरवा. बेसुमार किटकनाशके व तणनाशके यांची फवारणी . सांग मानवा माझ्या जीवची नुसती काहिली होतीया. तू लक्ष्मण रेषा ओलांडून माझ्यात अतिक्रमण केल्यास मला ही अवकाळी व धुकं धाडाव लागतंय*.
“मानवा” तरी मी तुला वेळोवेळी सावध करतो.पण तू पहिले पाढे पंचावन्न असाच वागतो. तू माझ्यात ढवळाढवळ करु नकोस. मी तुझ्या वाटेला जाणार नाही”.
निसर्गाची लक्ष्मण रेषा ओलांडू नका जगण्याची आशा सोडू नका
– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१