
दैनिक स्थैर्य । 17 मार्च 2025। फलटण । जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही अनमोल रत्न घडविणारी खाण असून शासन अनेक सुविधा पुरवित असताना शाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे. अशी अप्रत्यक्ष खंत व्यक्त करून प्राथमिक शाळांचा पट वाढविण्यासाठी शिक्षकांनीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर, अंगणवाडी व शेंडे वस्ती विडणी यांच्यावतीने आयोजित ’उत्सव 2025 ’या सांस्कृतिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर सचिव धीरज अभंग, गटशिक्षणाधिकारी किरण सपकाळ, केंद्रप्रमुख लता दीक्षित, सरपंच सागर अभंग, सदस्य सचिन अभंग, अंगणवाडी पर्यवेक्षिका आशा रणवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सचिन पाटील म्हणाले, प्राथमिक शाळांमध्ये खाजगी शाळांच्या तुलनेत आजही दर्जेदार शिक्षण मिळते. याच विद्यानगर येथे शिकलेले माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रात अगदी मंत्रालयापर्यंत उच्च पदावर कार्यरत आहेत. अनेक रत्न घडविण्याची ताकद या प्राथमिक शाळांमध्ये आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहेच परंतु त्यांनी पालकांना प्राथमिक शाळांचेही महत्व समजून सांगावे व विद्यार्थ्यांचा पट वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
धीरज अभंग म्हणाले ,या विद्यानगर शाळेच्या शिक्षक वर्ग अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. या शाळेच्या गुणवत्तेमुळेच आज येथे प्रवेश घेण्यासाठी अनेक पालकांची रिघ लागलेली असते. येथे शिकलेले अनेक माजी विद्यार्थी आज जवळपास सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या यशासाठी टणार्या शिक्षकांनाही सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज असते.
दरम्यान अंगणवाडी सहित इयत्ता 1 ली ते 5 वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली विशेषता ’जन्म बाईचा खूप घाईचा’, शिवकन्या तसेच अंगणवाडीच्या बालचमूंनी सादर केलेल्या कोळीगीताने विशेष वाहवा मिळविली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. तसेच परिसरातील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या अधिकार्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मुख्याध्यापक राजाराम तांबे यांनी प्रस्ताविक केले. उपशिक्षक रवींद्र परमाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास बहुसंख्येने शिक्षक पालक उपस्थित होते.