रवींद्रनाथ टागोर म्हणतात, “एखादा शिक्षक जर स्वतःच अध्ययन करत नसेल, तर तो योग्य प्रकारे अध्यापन करतो आहे. असे म्हणता येणार नाही. एकाद्या दिव्याची स्वतःची वात जर जळत नसेल तर तो दुसरा दिवा कधीही पेटवू शकणार नाही. ज्या शिक्षकाने स्वतःच्या विषयाचा अभ्यास थांबविलेला आहे. आपल्या ज्ञानात जो भर घालीत नाही. तर केवळ ठराविक पाठच विद्यार्थ्यांना शिकवितो. असा शिक्षक त्यांच्या मनात माहिती साठवायला मदत करू शकेल, पण त्यांच्या मधील स्फुल्लिंग चेतवू शकणार नाही”
खरंच अध्ययन व अध्यापन एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिक्षक नेहमी प्रसन्न, चिंतनशील, प्रयोगशील, काळाबरोबर चालणारा, बदलत्या घटकांशी जुळवून घेणारा नेहमी हसतमुख राहिल्यास अध्ययन १००% यशस्वी होणार. आज मनासारखा तास झाला. यात समाधान तर आहेच. पण विद्यार्थ्यांना त्यातून किती चालना मिळाली हे पाहणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसीत होत आहे. वर्गात चैतन्याच्या सळसळत्या तरुणाई पुढं उभे राहून अध्ययन ही अनुभूती कोणत्याच तराजूत तोलता अथवा मोजता येणारी मनसंचित ठेव आहे.
आपण सारे भाग्यवंत आहोत की, आपणाला जिल्हा परिषद शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत अनेक गुरुजनांने घडवले. त्यांच्या आठवणीने आपण तृप्त होऊन जातो. त्यांचे दर्शन घडताच कळत नकळत आपण मनाने अथवा शरीराने नतमस्तक होतो. तो अनुभव शिक्षकांशिवाय कुणाला भेटतो ?