स्थैर्य , सातारा , दि .२८ : शिक्षक बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिक्षकच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता’ अशी भूमिका जाहीर करून गेल्या दहा वर्षातील बँकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडत बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी सर्व शिक्षक सभासदांना ‘चला शिक्षक बँक वाचवूया’ अशी साद घालत बँकेच्या संभाव्य निवडणुकीचे रणशिंग फुंकले. निमित्त होते ‘चला शिक्षक बँक वाचवूया’ या विशेष पुस्तिकेच्या प्रकाशनाचे. साताऱ्यात बलवंत फाउंडेशनच्या कार्यालयात झालेल्या या प्रकाशन समारंभास सातारा तालुक्यातील शिक्षक सभासदांची उत्स्फूर्त हजेरी होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश शिंगाडे, दत्तात्रय भांगे, एकल शिक्षक मंचचे जे. एन. जाधव, नंदकुमार कदम, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे प्रशांत मोरे, सेवानिवृत्त सभासद ध. नि. सावंत, चंद्रकांत बडदरे, वसंत धुमाळ, शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत रसाळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षक संघटना हे शिक्षकांसाठी कुटुंबच असते आणि संघटनेने शिक्षकांना सन्मानही मिळवून दिला, तरीसुद्धा गेल्या 25-30 वर्षांमध्ये संघटनेत काही चंगळवादी नेत्यांची चलती दिसून येत आहे. शिक्षक बँकेच्या कामकाजातही हीच परिस्थिती दिसून येत आहे, म्हणून शांत राहणे हा संयम नव्हे तर चंगळवादाला दिलेली मूकसंमती ठरेल व सहकाराच्या तत्वांचा अवमान होईल म्हणून जागृत गुरुजनांनी आता क्रांती घडवावी आणि त्याची सुरुवात यानिमित्ताने झाल्याचेही बळवंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
सेवानिवृत्त शिक्षकांना बँकेच्या कामकाजात सहभागी करून घ्यावे हा वसंत धुमाळ यांनी मांडलेला विचार आपण वचननाम्यातच घेतल्याचे बळवंत पाटील यांनी जाहीर केले, तसेच सेवानिवृत्तांसाठी मदत कक्ष, शिक्षक पाल्यांसाठी विशेष मार्गदर्शक योजना आदींचे नियोजन असल्याचे आपल्या भाषणात त्यानी सांगितले.
जात, धर्म, पंथ, संघटना, नातेवाईक व मित्र असा मर्यादित व भावनिक विचार न करता, बँक जगली पाहिजे; वाचली पाहिजे आणि वाढलीही पाहिजे, या भूमिकेतून बँकेच्या कामकाजाचा विचार झाला पाहिजे असे मतही बलवंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
जावलीतील शिवाजी शिवणकर म्हणाले, बँकेमध्ये सन 2008 पासून कोअर बँकिँग प्रणाली आहे, मात्र आजच्या डिजिटल क्रांतीच्या युगातसुद्धा बँकेकडे एटीएम नाही, मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग, यूपीआय या सुविधा तर शेकडो कोस दूर असल्याची खंत वाटते.
ध. नि. सावंत म्हणाले, अतिरिक्त कर्मचारी संख्येमुळे शिक्षक बँकेचे कामकाज दोन सत्रांमध्ये चालते आणि दोन्ही सत्रांचे मिळून16 तासांपैकी फक्त साडेनऊ तासच कामकाज चालते. म्हणजे काम न करताही बँकेच्या कर्मचाऱ्यांना साडेसहा तासांचा जादा पगार दिला जातो. इतका ढिसाळ नियोजनाचा कारभार केवळ नेतेमंडळींच्या मुलांना नोकर भरतीत संधी आणि कामात सवलत देण्यासाठी घडला आहे.
कोअर बँकिंग, अनावश्यक बढत्या, स्वेच्छानिवृत्ती आदी चुकीच्या धोरणामुळे कर्जदार सभासदांना ज्यादा व्याजदराचा फटका बसल्याचा आरोप चंद्रकांत बडदरे यांनी त्यांच्या भाषणात केला. या पुस्तिकेतील माहिती ही वास्तव असून बँकेत क्रांती घडवण्यासाठी आणि रक्तबंबाळ बँक वाचवण्यासाठी बलवंत पाटील यांच्या विचारांचेच धोरण अवलंबावे लागेल, अशी प्रतिक्रिया उपस्थित शिक्षकांनी या कार्यक्रमात व्यक्त केली. संघटनाविरहीत व सर्वसमावेशक पॅनलची निर्मिती करण्याचे बळवंत पाटील यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे यावेळी उपस्थित शिक्षक सभासदांनी जाहीर केले तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे राजेश शिंगाडे यांनी त्यांच्या संघटनेचा आगामी निवडणुकीसाठी पूर्ण पाठिंबा बलवंत पाटील यांच्या पॅनेलला देणार असल्याचे जाहीर केले. शांताराम शेळके यांनी प्रास्ताविक केले संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर मनोहर माने यांनी आभार मानले. कार्यक्रमास सातारा तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षण मोठ्या संख्येने उपस्थित होते.