स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७: टाटा कंपनीला नवीन संसद भवन बांधण्याचे कंत्राट मिळाले आहे. टाटा यांनी बुधवारी 865 कोटी रुपयात संसदेच्या इमारतीचे कंत्राट मिळवले. एका अधिकाऱ्यांने सांगितल्यानुसार, इमारतीचे बांधकाम 21 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही इमारत संसद भवनाच्या प्लॉट नंबर 118 वर बांधली जाईल.
या इमारतीचा मास्टर प्लॅन मागील वर्षी तयार करण्यात आला होता. राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट दरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांसाठी अधिक सदस्यांची क्षमता असलेल्या नवीन इमारती बांधल्या जातील. तसेच केंद्रीय सचिवालयासाठी 10 नवीन इमारती बांधल्या जातील. राष्ट्रपती भवन, विद्यमान संसद भवन, इंडिया गेट आणि राष्ट्रीय अभिलेखागार इमारत तशीच ठेवली जाईल. दरम्यान, मास्टर प्लॅन तयार करतांना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी हा प्लॅन अंतिम नसल्याचे स्पष्ट केले होते.
असे असेल नवीन संसद भवन
नवीन लोकसभेच्या इमारतीच्या सभागृहात 900 जागा असतील. भविष्यात लोकसभेच्या जागा वाढल्या तरी अडचण येऊ नये, यासाठीच असे करण्यात आले आहे.
नवीन सभागृहात एखा सीटवर दोन खासदारांची जागा असेल, ज्याची लांबी 120 सेंमी असेल. म्हणजेच एका खासदाराला 60 सेंमी जागा मिळेल.
संयुक्त अधिवेशनात याच दोन जागांवर तीन खासदार बसू शकतील. म्हणजेच एकूण 1350 खासदार बसू शकतील. राज्यसभेच्या नवीन इमारतीत 400 सीट्स असतील.
देशाची विविधता दर्शविण्यासाठी संसद भवनाची कोणतीही खिडकी इतर खिडकीशी जुळणारी नसेल. प्रत्येक खिडकी वेगवेगळ्या आकार आणि शैलीची असेल.
पंतप्रधानांचे निवासस्थान दक्षिण ब्लॉकच्या इमारती मागे बांधले जाईल
पंतप्रधानांचे निवासस्थान दक्षिण ब्लॉकच्या इमारती मागे बांधले जाईल. सध्या पंतप्रधानांचे घर 7 लोक कल्याण मार्गावर आहे. साऊथ ब्लॉकजवळ हे घर बांधण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानावरून कार्यालय आणि संसदेत जाण्यासाठी वाहतूक थांबवावी लागणार नाही.