तरुण हा गीतेचा केंद्रबिंदू तर तारुण्य हा ज्ञानेश्वरीचा गाभा – ह भ प प्रशांत महाराज ताकोते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, श्री क्षेत्र आळंदी दि . २८ : महाराष्ट्र ही संतांची भूमी असून भारतवर्षात प्रसिध्द आहे . माउली आणि तुकोबांच्या ओव्या व अभंगातून महाराष्ट्राची आध्यात्मिक व सामाजिक जडणघडण झाली आहे . ज्ञानेश्वरी हा तरुणाने युवा नाम संवत्सरात तरुणांसाठी लिहीलेला ग्रंथ आहे . तरुण हा गीतेचा केंद्रबिंदू आहे तर तारुण्य हा ज्ञानेश्वरीचा गाभा आहे  असे मत ह भ प प्रशांत महाराज ताकोते यांनी व्यक्त केले.

आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी , श्री क्षेत्र आळंदी , महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ व माय एफ एम इंडिया रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर दररोज सायंकाळी ४ वाजता ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ निरुपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . आज ( रविवार ) सोळाव्या दिवशी अकोला येथील ह भ प प्रशांत  महाराज ताकोते  यांनी दैवासुरसंपद्विभागयोग  या  सोळाव्या अध्यायावर सुरेख निरुपण केले .

मावळवित विश्वाभासु l नवल उदयला चंडांशु l

अद्वयाज्बिनी – विकाशु l वंदु आतां ll

ह भ प ताकोते महाराज म्हणाले ,  माउली ज्ञानोबाराय हे साहित्य आणि आध्यात्मिक क्षेत्रात विश्वगुरु आहेत . नवनवोन्मेषशालीनी प्रतिभा संपन्न ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीत चतुर्विध भूमिका आहेत . ते एक प्रतिभासंपन्न कवी , तत्वज्ञ , संत , योगी  आहेत . याचा प्रत्यय ज्ञानेश्वरीत वारंवार  येतो . ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रसालंकारसंपन्न  भाषेने साहित्यिकांना , आध्यात्म संपन्नतेने जिज्ञासूंना , वैराग्याच्या निरुपणाने वारकऱ्यांना , योगाच्या प्रतिपादनाने योग्यांना आकर्षित व मोहित करणारा आहे.

सोळावा अध्याय हा दैवीसंपत्ती व आसुरी संपत्तीच्या वर्णनाने फार वेगळा ठरला आहे .जिज्ञासूंला   ज्ञानप्राप्तीसाठी उपयोगी साधने म्हणजे  दैवी संपत्ती आणि प्रतिबंध म्हणजे आसुरी संपत्ती या दोन्ही संपत्तीचे वर्णन आहे . विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरुप प्रकाश होय . गुरुच्या बोधाने द्वैत आणि त्याचे ज्ञान मावळते व अद्वैत ज्ञानाचा विकास होतो . एकदा आत्मज्ञान झाले की सोहम मंत्राची प्रचिती येते . दैवी संपत्ती मुमुक्षूंना देवाचे सुख निर्माण करते . अद्वैत आणि विश्वात्मवृत्ती झाली की कशाचे भय रहात नाही . या कार्यक्रमाचे निवेदन ह भ प स्वामीराज भिसे यांनी केले .

उद्या सोमवार दि . २९ रोजी   बावी जि सोलापूर येथील ह भ प  ज्ञानेश्वर महाराज पाटील हे सायंकाळी ४ वाजता ” पालखी सोहळा पत्रकार संघ ” या फेसबुक पेजवर श्री ज्ञानेश्वरीच्या ” श्रध्दादिनिरुपणयोग  ” या सतराव्या अध्यायावर निरुपण करतील .

दरम्यान आज पहाटे श्री क्षेत्र आळंदी येथे आजोळघरी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची विधीवत पूजा , अभिषेक व आरती पालखी सोहळा प्रमुख योगेश महाराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आली . यज्ञेश्वर जोशी व राहूल जोशी यांनी पूजेचे पौरोहित्य केले . रात्री बाळोबा सातारकर यांच्या वतीने  कीर्तनाची तर बाबासाहेब आजरेकर फडाच्या वतीने जागराची सेवा करण्यात आली .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!