वादाच्या भोव-यात ‘तांडव’ : वेब सीरिजविरोधात लखनौत FIR दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.१८: सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेली तांडव या वेब सीरिजवरुन निर्माण झालेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीये. या वेब सीरिजमध्ये हिंदू विरोधी कंटेंट असल्याचा आणि हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी आता लखनौत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखनौच्या हजरतगंज कोतवाली येथे अ‍ॅमेझॉन प्राइम इंडियाचे ओरिजिनल कंटेंट हेड अरुणा पुरोहित, मालिकेचे दिग्दर्शक अली अब्बास जफर, निर्माता हिमांशु कृष्ण मिश्रा आणि लेखक गौरव सोलंकी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय पोलिस उपायुक्त सोमण बर्मा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “हजरतगंज कोतवाली येथून पोलिसांची एक टीम मुंबई येथे जाईल आणि एफआयआरमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची चौकशी केली जाईल.”

एफआयआर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार शलाभ मणि त्रिपाठी यांनी आरोपींना इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘लोकांच्या भावना दुखावणे कधीही सहन केले जाणार नाही. लवकरच ‘तांडव’ वादाशी निगडीत आरोपींना अटक केली जाईल.’

एफआयआरनुसार, 16 जानेवारी रोजी रिलीज झालेल्या या वेब सीरिजविरोधात सोशल मीडियावर यूजर्सनी रोष व्यक्त केला आहे. नेटक-यांनी सीरिजमधील वादग्रस्त दृश्य सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. पहिल्या एपिसोडमध्ये 17 मिनिटांच्या क्लिपमध्ये कलाकारांनी हिंदू देवतांची भूमिका साकारत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह संवाद म्हटले आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. संपूर्ण सीरिजमध्ये पंतप्रधानांसारख्या सन्माननीय पदावर असणा-या व्यक्तीला अत्यंत अपमानास्पद पद्धतीने दाखवले गेले आहे.

मुंबई पोलिसांनी वेब सीरिजच्या निर्मात्यांना पाठवले समन्स
भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर पोलिस स्टेशनमध्ये मालिकेच्या निर्मात्यांविरोधात हिंदू देवतांचा अपमान केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या मालिकेचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. रिपोर्टनुसार, पोलिसांनी आयटी कायद्याच्या कलम 295 ए, कलम 67 ए अंतर्गत गुन्हा दाखल केला असून निर्मात्यांना समन्स बजावले आहे.

सैफ-करीनाच्या घराबाहेर पोलिस तैनात

‘तांडव’ च्या वादाचा त्यातील कलाकारांच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होत आहे. हा वाद लक्षात घेता रविवारी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणा-या सैफ अली खानच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सैफ सध्या मुंबईत नसल्याचे सांगण्यात येत आहे. शूटिंगची कामे पूर्ण करण्यासाठी ते शहराबाहेर गेला आहे.


Back to top button
Don`t copy text!