स्थैर्य,मुंबई, दि. ४: राज्यात सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा सुरू आहेत. अशातच काँग्रेसचा उपमुख्यमंत्री करण्याची देखील चर्चा सुरू आहे. मात्र अशा बातम्यांमध्ये काहीच तथ्य नाही असे म्हणत अजित पवारांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज मुंबईत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिले जाणार असल्याचे चर्चा आहे, याबद्दल प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, एक वर्षापूर्वी महाविकास आघाडी स्थापन केली, तेव्हा सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन करत असताना समसमान कार्यक्रम आखण्यात आला होता. संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम आम्ही करतो, असे अजित पवारांनी स्पष्ट केले. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात इतरांनी चर्चा करण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.