छत्रपती शिवाजी महाराजांवरील अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांना निवेदन देताना आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पांडुरंग गुंजवटे, अड. संदीप लोंढे वगैरे.

आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची मागणी

स्थैर्य, फलटण : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून तमाम हिंदु धर्मियांचे श्रध्दास्थान आहेत. फलटणचे नाईक निंबाळकर राजघराणे हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्याशी संबंधीत आहे. श्रीमंत छत्रपती सईबाई महाराणी (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी) या देखील फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कोणतीही अवमानकारक बाब आम्ही सहन करणार नाही असा खणखणीत इशारा देत अशा प्रकारे टीका टिपण्णी व अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अग्रीमा जाशुआ व सौरव घोष यांनी स्टॅण्डअप कॉमेडी या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अपशब्द वापरुन ते युट्युब व अनेक सोशल माध्यमातुन प्रसिध्द केले असून त्यामध्ये अग्रिमा जाशुआ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्याबद्दल अत्यंत खालच्या स्तरावर जावुन टिपणी केली आहे व सौरव घोष याने देखील स्टैण्डअप कॉमेडी याच कार्यक्रमामध्ये विमानतळाचे नावाचे विषयावरुन अपशब्द वापरले आहेत. अशाप्रकारे कार्यक्रम प्रसिध्द करुन या दोघांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या व तमाम हिंदु धर्मियांच्या भावना दुखवल्या आहेत, त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध फलटण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करावा अशी मागणी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, संदीप लोंढे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु राजे म्हणून जगामध्ये प्रसिध्द व पुजनीय आहेत, त्यांच्या कार्य व बलिदानावर आजचा महाराष्ट्र उभा आहे असे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर अत्यंत खालच्या स्तरावर जावुन अपशब्द वापरणे ते स्वत:च्या फायद्यासाठी प्रसिध्द करणे असे कृत्य अग्रिमा जाशुआ व सौरव घोष यांनी केले असल्याचा आरोप करीत असे कृत्य करुन त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या तसेच तमाम हिंदु धर्मियांच्या भावनांना ठेच पोहचवली आहे, तसेच अशा प्रकारचे गैर शब्द वापरुन दोन वर्गियांमध्ये तेढ निर्माण होणे, धार्मिक भावनांना ठेच पोहचविणे असा गुन्हा केला असल्याचा आरोप करण्यात आला असून स्टॅण्डअप काँमेडी चॅनेलने वरील भाग प्रसिध्द केल्यामुळे त्यांचेवर देखील गुन्हा दाखल होणे  आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे.

तरी आपण फलटण पोलीस ठाणेमध्ये अग्रिमा जाशुआ, सौरव घोष व स्टॅण्डअप कॉमेडी या चॅनेलच्या दिग्दर्शक, निर्माता यांचेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरले बद्दल व संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल तसेच धार्मिक भावनांना ठेच पोहचविल्याबद्दल गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आ. दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, ॲड. संदीप लोंढे यांनी निवेदनाद्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!